
मजा-मस्तीमध्ये केलेले एक विधान महिलेच्या अंगाशी आले असून तिला स्वत:चा जीव गमवावा लागला आहे. एवढेच नाही तिच्या 43 दिवसांच्या बाळाचाही खून करण्यात आला. हा खून दुसरा तिसरा कोणी नाही तर तिच्याच पतीने केला. या थरारक प्रसंगामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
हैदराबादमधील अनाजपूर गावातील अब्दुल्लापूरमेटमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला, तर लहान बाळाला पाण्यात बुडवून ठार मारले. एका विधानावरून हा सर्व प्रकार घडला. आधी पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले आणि त्यानंतर पतीने पत्नीचा आणि बाळाची हत्या केली. लावण्या आणि क्रियांस अशी मृतांची नावे असून धनराज असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी फरार आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लावण्या आणि धनराज हे दाम्पत्य मोलमजुरी करून कुटुंबाचा उदनिर्वाह करत होते. काही महिन्यांपूर्वी कौटुंबीक वादातून ही महिला आपल्या माहेरी निघून गेली होती आणि सासरी परतण्यास नकार देत होती. त्यावेळी ती गर्भवती होती. माहेरी असतानाच तिला क्रियांश नावाचा मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर धनराजने कशीबशी समजूत काढून लावण्याला पुन्हा नांदण्यासाठी सासरी आणली. मात्र पत्नीवर त्याची नाराजी कायम होती.
पत्नी घरी आल्यानंतर धनराजने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केला. यादरम्यान लावण्याने मजा-मस्तीत नवजात बाळ तुझे नसल्याचे म्हटले. तसेच ती वारंवार त्याला टोमणे मारत होती. याचा राग आल्याने धनराजने आधी लावण्याचा कुऱ्हाडीने वार करून खून केला आणि त्यानंतर बाळाला पाण्यात बुवडून मारले. या दुहेरी हत्याकांडानंतर तो फरार झाला होता. मात्र पोलिसांनी काही दिवसातच त्याला अटक करून तुरुंगात टाकले.
























































