लंडनमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थिनीची हत्या, ब्राझीलियन तरुणाने केला चाकूहल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लंडनमध्ये उच्चशिक्षणासाठी गेलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थिनीची तिच्या फ्लॅटमेटनं चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणासह तरुणीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तेजस्विनी रेड्डी (27) असे त्या तरुणीचे नाव असून ती मुळची हैदराबादची आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना लंडनमधील वेम्बली येथील नील्स क्रिसेंट येथील आहे. आरोपी व्यक्तीने दोघांवर हल्ला केला आहे. यामध्ये तेजस्विनीचा मृत्यू झाला असून दुसऱ्या तरुणीला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिची परिस्थिती स्थिर आहे. या घटनेनंतर पोलिसांनी एका तरुणासह तरुणीला अटक केली आहे. मात्र चौकशीनंतर 23 वर्षाच्या तरुणीला सोडून देण्यात आले आहे. तेजस्वीनीवर हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव केवन अँटोनिओ लॉरेन्स्को डे मोराईस (24) असे आहे, त्याचे फोटो लंडन पोलिसांनी प्रसिद्ध केले आहेत. फोटो पाहून नागरिकांकडून त्याच्याबाबतची अधिक माहिती मिळू शकेल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. या घटनेचा सध्या तपास सुरू आहे.

हैदराबाद येथे राहणाऱ्या तेजस्वीनीच्या काकांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यापूर्वीतच तिने फ्लॅट घेतला होता. तिथे तेजस्विनी आपल्या मित्रमैत्रीणींसोबत राहत होती. तिथे तो ब्राझिलीयन तरुणही राहत होता. त्याच विद्यार्थ्याने तेजस्विनीसह एकीवर हल्ला केला. दोघींना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेजस्विनीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तेजस्विनी मास्टर डिग्री मिळविण्यासाठी मागच्या वर्षी मार्च महिन्यात लंडनला गेली होती. तेजस्विनीच्या नातेवाईकांच्या माहितीनुसार, तिच्या वडिलांची तब्येत बिघडली होती. त्यांना पाहण्यासाठी ती सहा महिन्यांपूर्वी घरी आली होती. आता तिचे दोन महिन्यांचे शिक्षण बाकी होते. ते संपवून ती घरी हैदराबादला परतणार होती. त्याचवेळी तिची हत्या झाली. हत्येच्या बातमीनंतर ब्रम्हानपल्लीमध्ये तेजस्विनीच्या घरी नातेवाईकांची रीघ लागली आहे, घरात शोककळा पसरली आहे.