
रुग्णालय म्हटलं की, रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी ठेवावी लागते किंवा या हॉस्पिटलमध्ये सुविधा नाही, तुम्हाला दुसरीकडे जावे लागेल, असे रेफर केले जाते. परंतु हैदराबादेतील ईएसआयसी मेडिकल कॉलेज व रुग्णालय याला सपशेल अपवाद ठरले आहे. हे हॉस्पिटल देशातील पहिले झीरो रेफरल हॉस्पिटल ठरले आहे. या ठिकाणी अनेक शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. तसेच एकाही रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवले जात नाही. गेल्या तीन वर्षांत या रुग्णालयात 26 किडनीचे यशस्वीरीत्या प्रत्यारोपण करण्यात आले आहे. तसेच 1600 हून अधिक ओपन हार्ट शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रिया, डायलिसिस घेत असलेल्या महिलेच्या सुरक्षित प्रसूती आदींवर उपचार करण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयात या सर्व उपचारांवर लाखो रुपये आकारले जातात. परंतु या ठिकाणी हे सर्व उपचार अगदी मोफत केले जातात हे विशेष. रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये 34 विभाग आहेत. तसेच 17 सुपरस्पेशालिटीज आहेत. 2024 या वर्षात या ठिकाणी 8 लाख रुग्ण ओपीडीमध्ये आल्याची नोंद आहे. रुग्णांना औषधे घरी पुरवण्याची सुविधासुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे.