इंद्राणी मुखर्जीकडून जिवाला धोका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीकडून आपल्या जिवाला धोका असल्याचा धक्कादायक आरोप या प्रकरणातील एक महत्त्वपूर्ण साक्षीदार असलेला तसेच इंद्राणी मुखर्जीचा सख्खा मुलगा असलेल्या मिखाईल बोरा याने करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

मी माझ्या गुवाहाटी इथल्या घरात अगदी एकटा राहत आहे. मला तेथे मदत करणारा कुणीही नाही. इंद्राणीची आई आणि आपली आजी असलेल्या दुर्गाराणी बोरा हिने तिच्या मालमत्तेचा एकमेव वारसदार मला केले आहे. इंद्राणीचा प्रखर विरोध असतानाही आपल्या आजीने तिची सर्व मालमत्ता माझ्या नावावर केल्यामुळे इंद्राणीकडून मला संपविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे असा आरोप मिखाईलने सीबीआयला एक ई-मेल पाठवून केला आहे.

सीबीआयचे अधिकारी के. के. सिंग यांनी एक अर्ज दाखल करून यासंदर्भात योग्य ते आदेश देण्याची विनंती न्यायालयास केली, परंतु न्यायालयाने या अर्जावर आज कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र या प्रकरणाची सुनावणी आता या आठवडय़ात होईल अशी चिन्हे आहेत.