आयबी बोर्डाची दहावीची परीक्षाही रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीबीएसईपाठोपाठ आयबी बोर्डा (इंटरनॅशनल शिक्षण मंडळ)ने हिंदुस्थानातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत बोर्डाने हा निर्णय घेतला असून यामुळे राज्यातील आयबी मंडळात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती आणि अधिक तपशील जाणून घेण्यासाठी पालकांनी संबंधित शाळांशी संपर्क साधावा, अशी सूचना बोर्डाने केली आहे. तर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया कोर्सवर्कच्या आधारे त्यांचे मूल्यांकन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांना वर्षभर विविध स्तरावर झालेले मूल्यांकन या आधारे अंतिम श्रेयांक देण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. याचबरोबर शाळांनी विद्यार्थ्यांना विविध कौशल्य अवगत झाले की नाही याची तुलना करून अंतिम श्रेयांक द्यावा, अशा सूचना मंडळाने शाळांना दिल्या आहेत.