
क्रिकेट या खेळाला अधिक गतिमान आणि रोमांचक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नवनवीन नियम अंमलात आणत असते. यात आणखी एका नियमाची भर पडली असून टी-20 आणि वन डे या क्रिकेटच्या दोन्ही प्रकारांमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला वेळेचे बंधन असणार आहे. दोन षटकांमधील वेळ कमी करण्यासाठी आयसीसीने ‘स्टॉप क्लॉक’चा नियम लागू केला आहे. त्यामुळे आता एक षटक संपल्यानंतर दुसरे षटक एका मिनिटाच्या आत सुरू होणे अनिवार्य असणार आहे. जून महिन्यात सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपपासून हा नवा नियम कायमस्वरुपी लागू केला जाईल. शुक्रवारी आयसीसीच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला. याआधी हा नियम प्रायोगिक तत्तावर सुरू होता.
डिसेंबर 2023 पासून वेळेच्या बंधनाचा नियम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला होता. या नियमाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला फायदा झाला असून वन डे क्रिकेटच्या एका लढतीत तब्बल 20 मिनिटे यामुळे वाचली. त्यामुळे आगामी टी-20 वर्ल्डकपपासून हा नियम कायमस्वरुपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आयसीसीने दिली आहे.
स्टॉप क्लॉकचा हा नियम नुकत्याच झालेल्या वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीदरम्यान अमलात आणला गेला होता. त्यानंतर हा नियम प्रत्यक्षात वन डे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात आला. स्टॉप क्लॉकचा हा नियम टेनिसमध्ये शॉट क्लॉक म्हणून आधीपासूनच वापरला जात आहे. टेनिसमध्ये खेळाडूला पॉइंट मिळविल्यानंतर 25 सेकंदाच्या आता आपली सर्व्हिस करावी लागते.
2018 साली एमसीसीने आपल्या बैठकीत स्टॉप क्लॉकच्या वापराबाबत आयसीसीला कळवले होते. तसेच माजी कसोटीपटू सौरभ गांगुली, रिकी पॉण्टिंग आणि कुमार संगक्कारा यांनी हा नियम डेड टाइममध्ये वापरला जावा, अशी शिफारस केली होती.
आर्थिकसह 5 धावांचा दंड
क्रिकेटमध्ये अनेकदा षटक टाकल्यानंतर दुसरे षटक सुरू करण्यासाठी क्षेत्ररक्षण करणारा संघ उशीर करत असतो. त्यामुळे अशा संघांवर संथ गतीने गोलंदाजी केल्याप्रकरणी आजवर आर्थिक दंड केला जात होता. मात्र आता आर्थिक दंडाबरोबर पाच पेनल्टी धावांची तरतूदही करण्यात आली आहे. दोन षटकांमधल्या खेळाला आणखी वेगवान करण्यासाठी या स्टॉप क्लॉकचा वापर केला जाणार आहे. आधीचे षटक संपल्यानंतर दुसरे षटक 60 सेकंदांत सुरू होणे बंधनकारक असेल. जर ते षटक 60 सेकंदांत सुरू करण्यात गोलंदाज अपयशी ठरला आणि डावात ही चूक तीनदा केली तर त्या संघावर पाच धावांची पेनल्टी लावली जाणार आहे. तसेच दोन षटकांमधील अंतर 60 सेकंदांहून अधिक वाढल्यास पाच धावांच्या पेनल्टीसह सर्कलच्या बाहेर केवळ चार क्षेत्ररक्षकच ठेवता येणार आहेत.



























































