
आयसीसी टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा धुव्वा उडवत हिंदुस्थानी संघाने दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर अखेरच्या षटकापर्यंत धाकधुक वाढवणाऱ्या लढतीत हिंदुस्थानने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. आता जेतेपदासाठी हिंदुस्थानसमोर न्यूझीलंडचे तगडे आव्हान असणार आहे. दरम्यान, वानखेडेवरील ऐतिहासिक विजयानंतर हिंदुस्थानी संघाचे दिग्गज सुनील गावसकर यांनी टीम इंडियाच्या मानसिक ताकदीचे तोंडभरून कौतुक केले. तसेच फायनलमध्येही हिंदुस्थानच बाजी मारेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
गावसकर यांनी हिंदुस्थानी संघाच्या यंदाच्या वर्ल्डकपमधील वाटचालीवर भाष्य केले. हिंदुस्थानचा संघ केवळ एका खेळाडूवर अवलंबून नाही, हेच आपल्या यशाचे खरे वैशिष्ट्य आहे. टीम इंडियाने काही सामने अतिशय अटीतटीच्या परिस्थितीत जिंकले. अशा वेळी संघाने आपला संयम ढळू दिला नाही, हीच त्यांची खरी मानसिक ताकद आहे. प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी जबाबदारी उचलली आणि संघाला विजय मिळवून दिला, असे गावसकर म्हणाले.

अंतिम सामन्यात हिंदुस्थानची लढत न्यूझीलंडशी होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर किवी संघाच्या कामगिरीवर बोलताना गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली. न्यूझीलंडनेही या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे अंतिम सामना कमालीचा रंगतदार होईल. दोन्ही संघ भरात आहेत, पण मला आशा आहे की हिंदुस्थान पुन्हा एकदा इतिहास घडवेल. सर्वांनी हिंदुस्थानी संघासाठी प्रार्थना करा, असे आवाहनही गावसकर यांनी चाहत्यांना केले. चेंबूर येथील मुंबई प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब येथे ‘डीपी वर्ल्ड सेलिब्रिटी गोल्फ स्पर्धे’ची घोषणा केल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमात हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह, मुरली विजय, मुरली कार्तिक, एस बद्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद आणि गुंडप्पा विश्वनाथ सहभागी झाले होते.
चॅम्प्स फाऊंडेशन काय आहे?
क्रिकेटवरील चर्चेसोबतच गावसकर यांनी त्यांच्या ‘चॅम्प्स फाऊंडेशन’ या संस्थेच्या कार्याबद्दलही महत्त्वाची माहिती दिली. 1999 मध्ये सुनील गावसकर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले, मात्र निवृत्तीनंतर जे आर्थिक संकटात सापडले आहेत, अशा खेळाडूंना आधार देणे हा या फाऊंडेशनचा उद्देश आहे. ही संस्था गरजू माजी खेळाडूंना दरमहा आर्थिक मदत पुरवते असेही गावसकर यांनी सांगितले. तसेच ही मदत म्हणजे कोणतेही दान नसून, हिंदुस्थानी क्रीडा विश्वासाठी त्या खेळाडूंनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे, असेही गावसकर यांनी स्पष्ट केले.




























































