#ICCWC2019 विश्वचषकापूर्वी हिंदुस्थानचा ‘दुहेरी’ सराव, या संघाशी होणार लढत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेपूर्वी हिंदुस्थानला दोन सराव सामने खेळण्यास मिळणार आहे. 30 मे पासून सुरू होणाऱ्या स्पर्धेच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक गुरुवारी आयसीसीकडून जाहीर करण्यात आले. यानुसार हिंदुस्थानचा पहिला सराव सामना 25 मे ला न्यूझीलंडविरुद्ध, तर दुसरा सराव सामना बांग्लादेशशी 28 मे होणार आहे.

सराव सामन्यानंतर मुख्य स्पर्धा रंगणार असून इंग्लंडमध्ये होणाऱ्या या विश्वचषकात हिंदुस्थानचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. तर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 16 जूनला टीम इंडिया भिडेल.

यंदाचे वैशिष्ट्य
2019 इंग्लंड विश्वचषकाचे खास वैशिष्ट्य असणार आहे ते रॉबिन-राऊंड पद्धतीने होणारे सामने. या स्पर्धेत सर्व सामने रॉबिन-राऊंड पद्धतीने खेळले जाणार आहे. या प्रकारात प्रत्येक संघ प्रत्येक प्रतिस्पर्ध्या विरोधात एक सामना खेळणार आहे. यानंतर सर्वोत्तम 4 संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहेत.