
सामना प्रतिनिधी ।इगतपुरी
हावडा, दिल्ली, गोरखपूर आदी लांब पल्यांच्या गाडय़ा इगतपुरी रेल्वे स्थानकावर जास्त वेळ थांबतात. तसेच कसारा घाट चढ-उतार सुरळीत व्हावा म्हणून इंजिन लावण्यासाठी प्रवासी थांब्याच्या वेळेपेक्षा अधिक वेळ थांबतात. मात्र येथील चारही प्लॅटफॉर्मवर उंदीर, घूस, सरपटणारे प्राणी यांनी ठिकठिकाणी खड्डे करून पोकळ केले आहे. या स्थानकावर रेल्वे गाडय़ा आल्या की मोठय़ा प्रमाणात हादरा बसत असल्याने प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेल्वे स्थानकाच्या चारही प्लॅटफॉर्मवर उंदीर आणि घुशींनी मोठय़ा प्रमाणात खड्डे निर्माण केले असून खाद्यपदार्थ शोधण्याच्या नादात प्रवाशांच्या सामानाची नुकसान करतात, तर अनेक प्रवाशांना चावादेखील घेतल्याच्या घटना घडतात. रेल्वे स्थानकात विक्री होणारे पदार्थ हे उंदीर, घुशीने कुरतडलेले पदार्थ, लेंडय़ा अनेकदा प्रवाशांना आढळून आल्याने याची तक्रारसुद्धा न घेता संबंधित कॅटिंन ठेकेदाराला स्थानिक प्रशासन पाठीशी घालतात.
खाद्यपदार्थ उघडे व अस्त-वस्त पडलेले असते यामुळे उंदीर, घुशीच्या त्यावर मलमूत्र, लेंडय़ा मोठय़ा प्रमाणात आढळून येतात. येथे मूबलक खाद्य असल्याने प्लॅटफार्मवर ठिकठिकाणी खड्डे करून उंदीर, घुशी यांचे संख्या बळ वाढल्याने सर्व त्रास लांबपल्याच्या प्रवाशांना होतो. दरम्यान, या घुशी व उंदराचा सर्वात जास्त त्रास सर्व विकलांग, अपंग, दिव्यांग तसेच ज्येष्ठ व्यक्ती प्रवाशांना होत असून त्यांना प्रवास करण्यासाठी गाडीची वाट पाहत असताना प्लॅटफॉर्मवर खूप कसरत करावी लागते.
आरोग्यालाही धोका…
इगतपुरी रेल्वे स्थानकावर लांब पल्याच्या गाडय़ा थांबतात. त्याचबरोबरच मनमाड, नाशिक येथून दररोज जाणारे चाकरमानी मुंबईला जात असतात. या स्थानकावर उंदीर, घुशी सांडलेले खाद्यपदार्थ शोधण्यासाठी फिरतात. त्यातच पावसाळा सुरू झाला असून अनेक ठिकाणी उंदीर, घुशी मृत अवस्थेत कुजलेले आढळून येत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.



























































