कर्करोगावर मात करण्यासाठी आयआयटी मुंबईचे आधुनिक संशोधन, भयानक केमोथेरिपीला दिला नवीन पर्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्करोगाचे निदान झाल्यास त्या माणसासह त्याच्या कुटुंबीयांना खूप मोठा धक्का बसतो, पण त्याहून अधिक भीती रुग्णाला देण्यात येणाऱ्या केमोथेरिपीची असते. या उपचार पद्धतीमुळे आजारापेक्षा उपचार अधिक जालीम असतात असे म्हटले जाते. ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी आणि केमोथेरिपीमुळे रुग्णाचे होणारे हाल थांबविण्यासाठी आयआयटी मुंबईत संशोधन सुरू होते आणि त्याला आता यश आले आहे. कर्करोगग्रस्त रुग्णाच्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नेक्सकार 19 या नवीन थेरपीचा शोध लावण्यात आला असून ही थेरपी रुग्णांसाठी मोठा आधार ठरणार आहे.

कर्करोग आजारग्रस्त रुग्णांना लाईट आणि केमोथेरिपी उपचार देण्यात येतात, मात्र यात अनेक रुग्णांना खूप वेदना सहन कराव्या लागतात. परदेशात कर्करोगावर अनेक अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत, मात्र सामान्य माणसाला त्या ठिकाणी जाऊन उपचार घेणे शक्य नाही. त्यामुळे यावर आयआयटी मुंबईने तोडगा काढला असून परदेशात असणारी उपचार पद्धतीचा शोध लावला आहे आणि त्याला नेक्सकार 19 असे नाव दिले आहे. ही नवीन उपचार पद्धती टाटा रुग्णालय आणि इतर रुग्णालयांत वापरण्यात आली. 70 टक्के रुग्णांवर चांगला प्रभाव या नेक्सकार 19 थेरिपीचा दिसला असून रुग्णांच्या शरीरात इतर थेरिपीच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात टॉक्सिन सापडल्याची माहिती डॉ. हसमुख जैन यांनी दिली.

आयआयटी मुंबईमध्ये ही नवीन थेरिपी तयार करण्यासाठी नेतृत्व करणाऱ्या डॉक्टर टीमचे सदस्य राहुल पुरवार म्हणाले की, कर्करोगावर उपचार पद्धती शोधण्यासाठी आम्ही स्वप्न बघितले होते आणि ते खरे ठरले. अपूर्ण उपचार पद्धतीमुळे देशात अनेक कर्करोगग्रस्त रुग्ण मृत्यू पावत होते, मात्र आता या नव्या उपचार पद्धतीमुळे त्यांना जीवदान मिळणार आहे. या उपचार पद्धतीला सीडीएससीओतर्फे मंजुरी मिळाली असून येणाऱ्या काळात ही उपचार पद्धत नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.