
तीन वर्षांपूर्वी नोटाबंदी काळात तब्बल 625 टन नव्या नोटा देशभर पोहोचविण्याचे काम हवाईदलाने केले, अशी माहिती माजी हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी दिली. ‘आयआयटी मुंबई’च्या वतीने शनिवारी आयोजित टेकफेस्ट समारंभात ते बोलत होते.
20 किलोचे सामान राहू शकते अशा बॅगेतून एक कोटी रुपये नेता येत असतील तर अशा किती बॅगा आम्ही देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचविल्या हे सांगता येणे कठीण आहे. त्यावेळी हवाईदलाने 33 मोहिमांद्वारे 625 टन नव्या नोटा देशातील कानाकोपऱयात पोहोचविल्या होत्या, असेही ते म्हणाले.
बोफोर्स तोफांची तारीफ
माजी हवाईदल प्रमुख धनोआ यांनी लष्कराला मिळणाऱया उपकरणांवरील टीकांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या विवादांमुळे लष्कराला सैन्यसाहित्य मिळण्याची गती मंदावते. त्यासोबतच या वादांमुळे लष्करातील जवानांच्या सामर्थ्यावरही नकारात्मक प्रभाव पडतो. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात बोफोर्स तोफांचा व्यवहार झाला. त्या व्यवहारांवर जोरदार वाद उठला. वास्तविक बोफोर्स तोफा बेस्ट होत्या, असेही ते म्हणाले. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याबाबत बोलताना माजी हवाईदल प्रमुख म्हणाले की, बालाकोट प्रतिहल्ल्याच्या वेळी अभिनंदन हे मिग-21 विमानावर होते. त्यावेळी त्यांच्याकडे राफेल असते तर चित्र काही वेगळेच दिसले असते.



























































