कोरोना आणि ब्लॅक फंगसवर ‘एअर स्ट्राइक’; आयआयटीकडून विषाणू हवेतच मारणारे यंत्र विकसित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरस आणि ब्लॅक फंगस हा हवेतून नाका आणि तोंडात पोहचत असल्याचा दावा अनेक संशोधकांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोना विषाणू हे वायुमार्गाने पसरत असल्याचे मान्य केले आहे. कोरोना आणि ब्लॅक फंगसच्या विषाणूंवर ‘एअर स्ट्राइक’ करत ते हवेतल्या हवेतच मारणारे तंत्र विकसित करण्याला आयआयटीला यश आले आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची दुसरी लाट देशात ओसरू लागली आहे. त्यात ब्लॅक फंगस या घातक विषाणूने डोके वर काढले आहे. हवेतून नाका आणि तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करणाऱ्या या घातक विषाणूंचा हवेतच बंदोबस्त करणार ‘ऑण्टिमायक्रोबायल एअर प्युरिफायर’ नावाचे यंत्र आयआयटीच्या वैज्ञानिकांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आले आहे. हे यंत्र हवेतील कोणत्याही प्रकारचे  बॅक्टेरिया डिऑक्टिव्हेट करण्यास सक्षम असल्याचा दावा आयआयटी कानपूरच्या संशोधकांकडून केला जात आहे.

रुग्णालयात रुग्णांच्या आजूबाजूच्या हवेमध्ये असणारे व्हायरस बाहेर कसा काढायचा हा प्रश्न असतो. त्यावेळी युव्ही लाइट किंवा केमिकल स्प्रेचा वापर केला जातो. हे दोन्ही पर्याय मनुष्यासाठी हानीकारक असतात. हे लक्षात घेऊन आयआयटीच्या संशोधकांनी हे एक नवीन यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र संपूर्णपणे सुरक्षित असून याचा शरीरावर कोणताही साइड इफेक्ट होत नसल्याचे इनक्युबेटर एअर्थ कंपनीचे सीईओ रवी कौशिक यांनी म्हटले आहे.

आजूबाजूची हवा शुद्ध राहण्यास मदत

जेव्हा जिवंत विषाणू या एअर प्युरिफायरमध्ये येतात तेव्हा त्यांचे डिऑक्टिव्हेशन सुरू होते. या विषाणूंना खास फिल्टरद्वारे पकडून ते सिस्टीमद्वारे डिऑक्टिव्हेट केले जातात. हा प्युरिफायर कोरोना व्हायरस आणि फंगससारख्या छोटे कणदेखील डिऑक्टिव्हेट करू शकतो. यामुळे आजूबाजूची हवा 99 टक्के शुद्ध राहते.

  • हा एअर प्युरिफायर कोणत्याही प्रकारचे जंतू, व्हायरस, फंगस, बॅक्टेरियाला डिऑक्टिव्हेट करण्यास सक्षम आहे.
  • या प्युरिफायरद्वारे 600 स्क्वेअर फुटातील हवा व्हायरस आणि बॅक्टेरिया फ्री करता येते.