कोरोनामुळे परीक्षा हुकली तर पुन्हा संधी, आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना कोरोनामुळे परीक्षा देता न आल्यास अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी दिली जाणार आहे. विद्यार्थी किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे परीक्षेला बसू न शकणाऱया विद्यार्थ्यांसाठी आयआयटी मुंबईने हा निर्णय घेतला आहे.

26 एप्रिलपासून आयआयटी मुंबईच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार असून नुकत्याच झालेल्या सिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातच कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली आहे. सध्या आयआयटी मुंबई पॅम्पसमध्ये 3 हजारांहून अधिक विद्यार्थी, संशोधक आहेत. मात्र बाहेरील परिस्थिती लक्षात घेऊन सोमवारपासून सुरू होणाऱया परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तणावाखाली परीक्षा देण्याची वेळ येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा शेवटच्या सत्रात परीक्षा देण्याची संधी देणार असल्याचे आयआयटी मुंबईने स्पष्ट केले.

दरम्यान, अशाच प्रकारचे निर्णय देशातील इतर आयआयटींनी घेतलेले असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपस्थितीसाठी विविध प्रकारचे लेक्चर, अभ्यासक्रमही उपलब्ध करून दिलेले आहेत.शिवाय त्यातील माहिती, व्हिडीओ हे कधीही डाऊनलोड करून घेण्याची सुविधाही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.