गणित आणि विज्ञानाचा अभ्यास आता संस्कृतमधून होणार; आयआयटी इंदूरचा नवा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमध्ये आयआयटी इंदूरने सुरू केलेल्या एका अभ्यासक्रमाची जगभरात चर्चा होत आहे. या अभ्यासक्रमात गणित आणि विज्ञान हे विषय प्राचीन संस्कृत भाषेतून शिकवण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाची सुरुवात भास्कराचार्यांच्या लीलावती या ग्रंथापासून होणार आहे. गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांनी त्यांची मुलगी लीलावतीच्या नावाने या ग्रंथाची रचना केली होती. 22 ऑगस्टपासून हा अभ्यासक्रम सुरू झाला असून या अभ्यासक्रमासाठी जगभरातून 750 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अभ्याक्रमाचे पहिले सत्र 2 ऑक्टोबरला संपणार आहे.

आयआयटी इंदूरमध्ये भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, वैद्यक आणि वनस्पती शास्त्राचे अभ्यासक्रमाही संस्कृतमधून शिकवण्यात येत असून त्याचे 15 दिवसांसाठीचे कोर्स आहेत. या अभ्यासक्रमात या विषयांवर आधारित प्राचीन संस्कृत ग्रंथांचा विद्यार्थी अभ्यास करणार असून त्यावर चर्चाही करण्यात येणार आहे. संस्कृत ही प्राचीन ज्ञानभाषा असून या भाषेतील ज्ञानाचा उपयोग आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठीही होत आहे. त्यामुळे आगामी काळात संस्कृत ही ज्ञानविज्ञानाची भाषा बनेल, असे संस्थेकडून सांगण्यात आले. या अभ्याक्रमाचे उद्घाटन करताना संस्थेचे कार्यकारी संचालक प्रो. निलेशकुमार यांनी हे मत व्यक्त केले.

या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्यात येणार आहे. प्राचीन संस्कृत भाषेतील गणीत आणि विज्ञानासह इतर विषयांची विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. संस्कृत भाषेतील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संस्कृत भाषेतील ज्ञान ही काळाची गरज असल्याने त्याकडे आता लक्ष देण्यात येत आहे. प्राचीन विज्ञानाच्या ग्रंथावर चर्चा करण्यासाठी या भोषेतील ज्ञान अनुवादित करणाऱ्यांची गरज भासते. मात्र, अनेकदा अनुवाद करताना महत्त्वाचे पैलू दुर्लक्षित होतात. त्यामुळे आता विद्यार्थी ही भाषा आत्मसात करून त्यातील बारकावे समजून घेणार आहेत, असे प्रो. गंती.एस. मूर्ती यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात विद्यार्थी भाषा शिकणार असून पुढील टप्प्यात ते यावर चर्चा करणार आहेत.

अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. संस्कृत भाषेचे ज्ञान असणाऱ्यांना थेट दुसऱ्या टप्प्यात प्रवेश देण्यात यणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना संस्कृतमध्ये चर्चा करणे सक्तीचे आहे. जे या चर्चेत सहभागी होणार नाही, त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, असे मूर्ती यांनी सांगितले. या अभ्यासक्रमाची नोंदणी केलेल्यांमध्ये 30 टक्के विविध क्षेत्रात काम करणारे आहेत. 50 टक्के पदवी आणि पदविकेचे विद्यार्थी आहेत. तर इतर पीएचडी आणि इतर क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. या अभ्यासक्रमासाठी विशेष पॅनल बनवण्यात आले आहे. त्यात संस्कार भारतीचे प्रमोद पंडित, मयूरी फडके आणि प्रवीण वैष्णव पहिल्या सत्रातील विशेषज्ञ आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मुंबई आयआयटीचे प्रोफेकर राम सुब्रमण्यम आणि डॉ. के. महेश विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.