ठाण्यात खेळाच्या मैदानावर मृतदेहाचे बेकायदा दफन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ठाण्याच्या वर्तकनगर येथील खेळाच्या मैदानावर बेकायदा मृतदेह दफन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चच्या ट्रस्टींविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून सदर भूखंडावर मृतदेह दफन करण्याचा प्रकार थांबविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

 ठाण्यातील पोखरण रोड येथे लिटिल फ्लॉवर शाळेजवळ मोकळा भूखंड असून सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च ट्रस्टद्वारे हा भूखंड बळकावण्याचा प्रकार सुरू आहे. ठाणे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता या मैदानाचे रूपांतर दफनभूमीत करण्याचा ट्रस्टींनी घाट घातला आहे. फेब्रुवारी 2019 पासून आतापर्यंत तीन मृतदेह सदर मैदानात दफन करण्यात आले आहेत. बेकायदेशीररीत्या मृतदेह दफन केल्यामुळे पोलिसांनी 11 जणांना अटकही केली आहे. असे असतानाही मृतदेह दफन करण्यात येत असल्यामुळे जीतेंद्रकुमार इंदिसे यांनी याविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

पुरलेले मृतदेह पुन्हा बाहेर काढा

याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की, सदर जागेवर पालिकेची कोणतीही परवानगी न घेता मृतदेह दफन करण्यात येत आहेत. त्यामुळे दफन केलेले मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात यावेत व सदर मैदान पुन्हा पूर्ववत करण्याचे पालिकेला आदेश द्यावेत. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत राज्य सरकारला याप्रकरणी उत्तर देण्याचे आदेश दिले व सुनावणी महिनाभरासाठी तहकूब केली. राज्य सरकारच्या वतीने ऍड. निशा मेहरा यांनी बाजू मांडली.