
मुंबईतील मालाडच्या एरंगले गावात बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी अभिनेते, राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांना मुंबई महापालिकेने (BMC) नोटीस बजावली आहे. दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांनी बेकायदा बांधकामाचे आरोप फेटाळून लावले आहेत.
मालाडच्या मढ भागातील एरंगले गावात अनधिकृत बांधकामाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या आरोपांचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी खंडन केले आहे. बेकायदेशीर बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईचा एक भाग म्हणून, नागरी संस्थेने मुंबई महानगरपालिका (एमएमसी) कायद्याच्या कलम 351(1A) अंतर्गत चक्रवर्ती यांना नोटीस बजावली आहे.
10मे रोजी महानगरपालिकेने बेकायदेशीर असलेल्या 101 मालमत्तांची यादी तयार केली आहे. यामध्ये मालाडमधील एरंगल गावातील हीरा देवी मंदिराजवळील भूखंडाचा समावेश आहे, जो मिथुन चक्रवर्ती यांच्या मालकीचा आहे. त्या ठिकाणी परवानगीशिवाय ग्राउंड प्लस मेझानाइन फ्लोअर असलेल्या दोन स्ट्रक्चर्स, ग्राउंड फ्लोअरचा एक स्ट्रक्चर आणि 10 बाय 10 चे तीन तात्पुरते युनिट्स बांधण्यात आल्याचा आरोप बीएमसीने केला आहे. या युनिट्समध्ये विटा, लाकडी फळ्या, काचेच्या भिंती आणि एसी शीट छतांचा वापर करण्यात आला आहे, जो बेकायदेशीर आहे.
बीएमसीने जारी केलेल्या कायदेशीर नोटीसनुसार, जर मालमत्ता मालकाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर त्याच्याविरुद्ध कलम 475 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल आणि बेकायदेशीर बांधकाम पाडले जाईल. नोटीसला उत्तर देताना, मिथुन चक्रवर्ती यांनी आरोप फेटाळून लावत म्हटले की, “आपण कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. अनेकांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत आणि आम्ही आमची उत्तरे पाठवत आहोत.”


























































