इमारतीत बेकायदा हॉटेल, सोनू सूदला पालिकेची नोटीस!  जुहू पोलिसात तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सोनू सूद याने आपल्या निवासी इमारतीत बेकायदेशीरपणे हॉटेल सुरू केल्याबद्दल पालिकेने नोटीस बजावली असून जुहू पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. महाराष्ट्र नगर नियोजन कायद्यांतर्गत ही नोटीस बजावून गुन्हा नोंद करण्याची मागणीही पालिकेने केली आहे.

सोनू सूद यांनी जुहू येथील शक्तीसागर या निवासी इमारतीत हॉटेल सुरू केल्याबद्दल पालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. यानुसार 24 ऑक्टोबरला पालिकेच्या पथकाकडून पाहणीही करण्यात आली होती. यावेळी मंजूर आराखड्यानुसार जागेचा वापर करावा अशी नोटीसही पालिकेकडून देण्यात आली होती. जागेच्या वापरात बदल करताना आवश्यक परवानग्या घ्याव्यात असे निर्देशही दिले होते.  असे असताना  पालिकेच्या पथकाने पुन्हा या जागेचा पाहणी केली असता हॉटेलच असल्याचे आढळले.