
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव नवीन टोलनाक्याजवळ शुक्रवारी पहाटे गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतूकीवर कारवाई केली. त्यात 1 लाख 80 हजार रुपयांच्या अवैध दारूसह एकूण 5 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बिनापरवाना गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी तेजस दिनेश गिरी ( वय 26, रा. माठेवाडा, सावंतवाडी) व आत्माराम लक्ष्मण आरोंदेकर (वय 27, रा. सातार्डा, सावंतवाडी) यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून गोवा बनावटीच्या अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापुर उपायुक्त व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील भरारी पथकाचे निरीक्षक एस. के. दळवी, दुय्यम निरीक्षक यू. एस. थोरात, जवान आर. डी. ठाकूर, दिपक वायदंडे, जे. आर. चव्हाण, एच. आर. वस्त, आर. एस. शिंदे यांच्या पथकाने कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील नवीन टोलनाका येथे सापळा रचला होता. त्यानुसार शुक्रवारी पहाटे या पथकाने मुंबईच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार तपासणीसाठी थांबवली. तपासणी केली असता कारमध्ये 1 लाख 72 हजार 800 रूपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या हनी गाईड ब्रैंडीचे 45 बॉक्स आणि गोवा बनावटीच्या मॅगडॉल नंबर 1 व्हिस्कीचा 1 बॉक्स असे 1 लाख 80 हजार रूपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या दारुचे 46 बॉक्स आणि अवैध दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली 4 लाख रूपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण 5 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गोवा बनावटीची बिनापरवाना दारुची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी तेजस गिरी आणि आत्माराम लक्ष्मण आरोंदेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























































