
केंद्राने पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंवर बंदी घातलेली असतानाही शहरात बेकायदेशीररीत्या सौंदर्यप्रसाधनांची विक्री सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. सिटी चौक पोलिसांनी शहागंज, घासमंडी आणि सिटी सेंटर मॉल परिसरातील तीन दुकानांवर एकाच वेळी छापे टाकत सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तिघा व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
घासमंडीतील हायलाईट कलेक्शन, शहागंजमधील ओम ट्रेडर्स आणि सिटी सेंटर मॉलमधील फलक इम्पोरियम या दुकानांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर बंदी असलेली सौंदर्यप्रसाधने आढळून आली. पोलिसांनी केलेल्या झडतीत हम्मद अबरार याच्याकडून ५२,१८० रुपये, अंकुर अग्रवाल याच्याकडून ६,००० रुपये आणि जुमान खान याच्याकडून १,८०० रुपयांचा असा एकूण ५९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. प्रकरणात अंमलदार प्रवीण टेकले यांच्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक राठोड करत आहेत. या प्रकरणी मोहम्मद अबरार मोहम्मद मसुयोद्दीन (रा. नवाबपुरा), अंकुर अजय अग्रवाल (रा. शहागंज) आणि जुमान मोहम्मद हनिफ खान (रा. शहाबाजार) यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली. २ मे २०२५ रोजी केंद्र सरकारने पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर संपूर्ण बंदी लागू केली आहे. मात्र, शहरात काही व्यापाऱ्यांकडून विनाबिल व बेकायदेशीर मार्गाने अशा उत्पादनांची विक्री सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.



























































