सोसायटीच्या आवारात थाटली अनधिकृत दुकाने, कुर्ल्यातील वाडिया इस्टेटमधील प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिंधे गटाच्या आमदाराच्या वरदहस्तामुळे कुर्ला पश्चिमेकडील वाडिया इस्टेट इमारत क्र. 4 मधील किरण पवार या रहिवाशाने दहशत माजवून सोसायटीच्या मोकळ्या जागेत तीन अनधिकृत दुकाने थाटली आहेत. याप्रकरणी सोसायटीच्या एका सदस्याने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर अनधिकृत बांधकाम हटवून सोसायटीची जागा पूर्वीप्रमाणे मोकळी करून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पालिकेच्या एल विभागाच्या अधिकाऱयांनी मात्र दुकाने तोडण्याऐवजी केवळ दुकानाचे पत्रे आणि शटर बाजूला काढत बांधकाम तसेच ठेऊन न्यायालयाच्या आदेश धाब्यावर बसवले आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे.

कुर्ला पश्चिम बैलबाजार येथील वाडिया इस्टेट कॉलनी येथे 19 इमारती आहेत. येथील इमारत
क्र. 4 मध्ये किरण पवार या व्यक्तीने 2021 साली तळमजल्यावरील रु. क्र. 120 विकत घेतला. त्यानंतर त्यांनी रुमला लागून असलेल्या सोसायटीच्या खुल्या जागेत तीन अनधिकृत दुकाने थाटली, असा आरोप सोसायटीचे सदस्य अतुल परब यांनी केला आहे. अनधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल न घेतल्याने आपण उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे परब यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाने अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश 13 जुलै 2022 महापालिकेला दिले. मात्र, महापालिकेने या आदेशाचे पालन न केल्यामुळे आम्ही न्यायालयात धाव घेतली. 20 जानेवारी 2023 रोजी न्यायालयाने पुन्हा कारवाईसाठी सहा आठवडय़ाचा वेळ पालिकेला दिला. अखेर, 2 मे रोजी केवळ दुकानाचे पत्रे आणि शटर बाजूला काढून पालिकेने कारवाईचा दिखावा केला असा आरोप परब यांनी केला आहे. अनधिकृत दुकाने पाडून सोसायटीची जागा पूर्वीप्रमाणे मोकळी करून रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

पालिकेचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करतायत

किरण पवार हे मिंधे गटातील आमदाराचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे किरण यांनी सोसायटीत अनधिकृतरित्या दुकाने थाटली. कोर्टाच्या आदेशानंतरही पालिका बांधकाम तोडण्याची हिंमत दाखवत नाही. त्यामुळे पालिकेचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करतायत, असा सवाल परब यांनी उपस्थित केला आहे.