
मी एक नाही दहा वेळा बोललो आहे, मी जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे. वर्षभरासाठी, दोन वर्षांसाठी जेलमध्ये राहू, पण भाजपमध्ये जाणार नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले. विरोधक म्हणून लढू तर द्या, सर्वच भाजपमध्ये गेले तर मग लढणार कोण, असा सवालही त्यांनी केला.
जो आक्रमक असतो, त्याला बदनाम करण्यासाठी एक टोळी तयार करण्यात आली आहे. ती टोळी भाजप प्रवेशाच्या अफवा वारंवार पसरवत असते. आता माझ्या आमदारकीला 28-29 वर्ष झाले आहेत. मला कळत नाही, मी पहिल्या रांगेत बसणारा माणून मी तिसऱया रांगेत कशाला जाईन. मी एवढी वर्षे विविध पदांवर काम करतो आहे. विरोधी पक्ष नेता, मंत्री म्हणून काम केले आहे. विविध समित्यांवर काम करतोय. विधान परिषदेत राहिलो आहे. विधानसभेत सहा वेळा निवडून आलो आहे. आता आणखी काय हवे? असे सांगत वडेट्टीवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या.
सध्या तरी मी कुठल्याही सापळय़ात नाही
माझे नाव पक्ष बदलण्याच्या यादीत येऊ नये असे मला वाटते. ज्यांना कुठल्या तरी पदाची, कुठल्या तरी गोष्टींची अपेक्षा आहे, कुठल्या तरी सापळ्यात अडकण्याची भीती आहे, त्यांचा विचार असा असू शकतो. सध्यातरी मी कुठल्याही सापळ्यात नाही. त्यामुळे मी सुरक्षित आहे आणि गुरगुरतो आहे, असे मला वाटते, असे वडेट्टीवार म्हणाले.





























































