
वन डे वर्ल्डकपची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होणार असून सध्या सराव सामने सुरू आहेत. या वर्ल्डकपसाठी हिंदुस्थानच्या संघामध्ये फिरकीपटू युझवेंद्र चहलला स्थान मिळाले नाही. यामुळे तो नाराज झाला असून आता दुर्लक्षित होण्याची सवय झालीय, अशी खंत चहलने व्यक्त केली.
हिंदुस्थानचे वन डे वर्ल्डकपमधील अभियान 8 ऑक्टोबरपासून होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानचा पहिलाच सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या वर्ल्डकपसाठी हिंदुस्थानने 15 सदस्यीय खेळाडुंची निवड केली असून यात तीन फिरकीपटूंना स्थान मिळाले आहे. रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि कुलदीप चहल या तिघांना स्थान मिळाले आहे. मात्र युझवेंद्र चहल याची संघात निवड झाली नाही.
याआधी 2021मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपसाठीही त्याच्या नावाचा विचार केला गेला नव्हता, तर 2022मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये संघाचा भाग असतानाही मैदानात उतरण्याची संधी त्याला मिळाली नव्हती. यामुळे आपल्याला डावलले जात असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली असून ती त्याने बोलूनही दाखवली.
View this post on Instagram
एका क्रिकेट मॅगझीनशी बोलताना युझवेंद्र चहल म्हणाला की, मी समजू शकतो की फक्त 15 खेळाडुंचीच संघात निवड होऊ शकते, कारण हा वर्ल्डकप आहे. इथे 17-18 खेळाडु घेऊन जाता येत नाही. मला नक्कीच वाईट वाटतंय, पण माझे ध्येय आयुष्यात पुढे जाण्याचे आहे. मला आता दुर्लक्षित होण्याची सवय झाली आहे. आता तर तीन वर्ल्डकप झाले आहेत.































































