
गेला महिनाभर राज्यभरात थैमान घालणारा पाऊस ऑगस्टमध्ये मात्र रजेवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ऑगस्टच्या फक्त पहिल्या आठवडय़ात पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महिनाभर दमदार पावसामुळे दिलासा मिळालेल्या जनतेला पुन्हा वेटिंगवर राहावे लागणार असून शेतीकामे खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईत या वर्षी पूर्ण जून महिना पावसाने दडी मारली. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी सध्या पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र जूनअखेरपासून सुरू झालेल्या पावसाने संपूर्ण जुलै महिना दमदार बरसात केल्याने समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. यातच पावसाने ‘ब्रेक’ घेतल्याच्या बातमीने शेतकरी हवालदिल झाला आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा सोडला तर संपूर्ण महिना कोरडा जाणार असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तीन दिवस मात्र पावसाचे
मुंबई, पुण्यासह राज्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये 2, 3 आणि 4 ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता आहे. यामध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



























































