विद्यार्थी, ज्येष्ठांना नो टेन्शन! प्रमाणपत्रे आता मिळणार दोन दिवसांत घरपोच

प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी, मुंबई

सरकारकडून विद्यार्थी आणि ज्येष्ठांना जारी करण्यात आलेली विविध प्रकारची प्रमाणपत्र केवळ दोन दिवसांत त्यांना घरपोच मिळणार आहेत. तसा सामंजस्य करार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोस्टामध्ये झाला असून त्यामुळे मुंबई उपनगरातील विद्यार्थी आणि ज्येष्ठांना त्याचा फायदा होणार आहे.

शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलीअर प्रमाणपत्र, वय, राष्ट्रीयत्व, डोमिसाईल, उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज करतात. ही प्रमाणपत्र त्यांना कुरिअर किंवा इतर अनेक मार्गांनी पाठवली जातात. ती विद्यार्थी तसेच ज्येष्ठांना कोणत्याही मानसिक ताणाशिवाय, टेन्शनशिवाय मिळाव्यात, याची कोणतीही तजवीज नव्हती. मात्र, आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोस्टाबरोबर केलेल्या सामंजस्य करारामुळे ही प्रमाणपत्रे बिनधोक त्यांच्या हाती पडणार आहेत.

‘विद्यार्थी आणि ज्येष्ठांना हवी असलेली प्रमाणपत्रे त्यांच्या हाती वेळेत पडावीत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय विभागावर मोठय़ा प्रमाणात दबाव असतो. हा दबाव कमी करावा, कोणतीही चूक न होता, वेळेत आणि घरपोच प्रमाणपत्रे मिळावीत, म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.’
– सचिन कुर्वे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी

कोकण प्रशासकीय विभागात मुंबई उपनगर जिल्हा येतो. त्याचे मुख्यालय वांद्रे येथे आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याअंतर्गत माहीम कॉजवे ते दहिसर, कुर्ला ते मुलुंड आणि कुर्ला ते ट्रॉम्बे हा परिसर येतो. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठांना त्यांना हवी असलेली प्रमाणपत्रे घरपोच मिळणार आहेत. या प्रमाणपत्रांवर विद्यार्थी आणि ज्येष्ठांचे फोटोही चिकटवण्यात येतील. त्यामुळे दलाल आणि गैरप्रकारांना आळा घालता येईल.

summary-important certificate will issue by home delivery