जगभरातून महत्त्वाच्या बातम्या

हॉलीवूड स्टार बॉलीवूडमध्ये दिसणार

हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सिडनी स्विनी बॉलीवूडमध्ये पाऊल टाकणार असल्याची चर्चा आहे. हिंदुस्थानातील सर्वात महागडय़ा चित्रपटांपैकी एक असलेल्या चित्रपटात काम करण्याची ऑफर देण्यात आली आहे. यासाठी सिडनीला तब्बल 530 कोटी रुपयांची ऑफर देऊ केली आहे. या चित्रपटाची शूटिंग 2026 पासून सुरू होण्याची शक्यता असून न्यूयॉर्क, पॅरीस, लंडन, दुबई यांसारख्या प्रमुख शहरांत शूटिंग केली जाणार आहे. सिडनी स्विनीला एचबीओच्या सुपरहिट सीरीज ईफोरिया आणि द व्हाईट लोटस यातून जागतिक ओळख मिळाली आहे.

27 फुटांच्या भिंतीवरून उडी मारून 2 कैदी पळाले

जयपूर कारागृहातील 27 फूट उंचीच्या भिंतीवरून उडी मारून दोन कैदी पळून जाण्यात यशस्वी झाले. नवल किशोर महावर आणि अनीस ऊर्फ दानीश असे या दोन्ही कैद्यांची नावे आहेत. हे दोघेही चार-पाच दिवसांपूर्वीच चोरीच्या आरोपाखाली कारागृहात दाखल झाले होते. बाथरूमची ग्रिल तोडून या दोघांनी पाईपच्या मदतीने खाली येत पलायन केले आहे. कारागृहातून पळालेले दोन्ही कैदी अट्टल चोर आहेत.

चीनच्या राष्ट्रपतींची टिकटॉक कराराला मंजुरी

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अमेरिकेसोबतच्या कराराला मंजुरी दिली आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. टिकटॉकवर आता अमेरिकेचे 80 टक्के नियंत्रण असणार आहे. हा करार अमेरिकेसाठी खूपच चांगला आहे. चीनसोबत डील करण्यात आम्ही यशस्वी झालो. हा आमच्यासाठी चांगला सौदा आहे. त्यांच्यासाठीही चांगला असेल, असे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेचे माइक वॉल्टज संयुक्त राष्ट्रात राजदूत

अमेरिकी सिनेटने माइक वॉल्ट्ज यांच्या संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्तीला मंजुरी दिली. हे पद गेल्या 8 महिन्यांपासून रिक्त होते. अखेर हे पद भरण्यात आले आहे. परंतु, सिनेटने एका वेगळ्या प्रस्तावावर मतदान केले नाही. ज्यामध्ये वॉल्ट्ज यांना औपचारिकपणे संयुक्त राष्ट्र महासभेत अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून घोषित करण्यात येणार होते. त्यामुळे हे अजून स्पष्ट नाही की, न्यूयॉर्कमध्ये पुढील आठवडय़ातील वार्षिक महासभा सत्रात ते भाग घेतील की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.

व्हॉट्सऍप डीपीला न्यायमूर्तीचा फोटो लावून धमकी

ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी आता प्रयागराज हायकोर्टातील एका न्यायाधीशाचा फोटो व्हॉट्सऍप डीपीला लावून दोघांना धमकीचा मेसेज पाठवला. न्यायाधीशाचे खासगी सचिव अरविंद गुप्ता यांनी सायबर ठाण्यात जाऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फोटोचा चुकीचा वापर करण्यात आल्याने न्यायाधीशाची प्रतिमा मलीन होत आहे. सायबर गुन्हेगाराने एका हवालदाराची पावणे दोन लाखांची आर्थिक फसवणूक केली.