इंडिया आघाडीला घाबरून मोदी देशाचे नाव बदलताहेत! – राहुल गांधी

हिंदुस्थानात सध्या महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या व्हिजनमध्ये लढाई आहे, असे ठाम प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी युरोप दौऱ्यावर असून शुक्रवारी त्यांनी ब्रसेल्समधील प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. हिंदुस्थानात लोकशाही आणि संस्थांवर हल्ले झाले आहेत. हिंसाचार आणि भेदभाव वाढला आहे. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी आणि खालच्या जातीवर हल्ले केले जात आहेत, असेही राहुल यावेळी बोलताना म्हणाले.

हिंदुस्थानात विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला घाबरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नाव बदलण्यासाठी आग्रही आहेत. ‘इंडिया’ आघाडी देशाचा आवाज आहे. पंतप्रधान घाबरले आहेत. त्यामुळे देशाचे नाव बदलत आहेत. हे सर्व माझ्या अदानींवरील पत्रकार परिषदेनंतर झाले आहे. देशाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून जाणीवपूर्वक हा मुद्दा आणल्याचे राहुल गांधी म्हणाले.  जी-20 चे अध्यक्षपद देशाला मिळाले ही चांगली बाब आहे. कश्मीर हिंदुस्थानचा एक भाग आहे. आपल्याशिवाय कोणालाही याच्याशी काही देणेघेणे नाही. आपण रशिया-युक्रेन युद्धावर देशाच्या भूमिकेला पाठिंबा देतो. रशियासोबत आपले चांगले संबंध आहेत. विरोधक असूनही या मुद्दय़ांवर काँग्रेस सरकारसोबत असल्याचे राहुल यांनी सांगितले.

60 टक्के जनतेचे नेतृत्व करणाऱ्यांना महत्त्व नाही

हिंदुस्थानचा मूळ पाया बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकांना गरिबीत ढकलले गेले आहे. हिंदुस्थानात गेल्या 40 वर्षांत सर्वात जास्त बेरोजगारी आहे. सरकारने जी-20 साठी मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रण पाठवले नाही. यावरून स्पष्ट होते की, देशातील 60 टक्के जनतेचे नेतृत्व करणाऱ्यांना महत्त्व दिले जात नसल्याचा आरोप राहुल यांनी केला.