
एकापेक्षा जास्त विवाह करणे आसाममध्ये आता गुन्हा ठरणार आहे. आसाम सरकारने विधानसभेत ‘आसाम प्रोहिबिशन ऑफ पॉलिगामी बिल, 2025’ हा बहुपत्नीत्त्वविरोधी विधेयक मंजूर केले आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.
नव्या विधेयकानुसार, एखादी व्यक्ती आधीपासून विवाहित असुनही किंवा आधीचा विवाह कायदेशीर संपुष्टात आलेला नसताना दुसरा विवाह केल्यास हा गुन्हा मानला जाईल. या गुह्यासाठी 7 वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. तसेच पीडितेला 1.40 लाख रुपयांची नुकसानभरपाईदेखील द्यावी लागेल. हा कायदा अनुसुचित जमाति तसेच अनुसुचित क्षेत्रांवर लागू नसेल. दोषी ठरलेल्यांना सरकारी नोकरी तसेच शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविता येणार नाहीत.
विवाह लपवल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास
एखाद्या व्यक्तीने विवाह लपवून दुसरा विवाह केल्यास आणखी कठोर शिक्षेची तरतूद या विधेयकात प्रस्तावित आहे. या गुह्यात 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा केल्यास प्रत्येकवेळी शिक्षा दुप्पट होईल.




























































