
सामना प्रतिनिधी । लातूर
महाराष्ट्रासहीत लातूर जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे खरीपाचे पीक गेले व रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला व त्यातून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कमी पावसामुळे पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, मजुरांना काम, अशा विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणींची सोडवणूक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये टँकर मागणी अधिक असतानाही संपूर्ण मराठवाड्यामध्ये सर्वात कमी टँकर लातूर जिल्ह्यात मंजुर केले आहेत. बोअर, मोटारीसाठी सहकार्य होत नाही. पिक विम्यासाठी भरणा केल्यास ४२ हजार रुपये विमा देण्याची तरतूद असताना अनेक भागात विमा मिळाला नाही तसेच मराडवाड्याचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी व मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी जननायक संघटना आवाज उठविणार असून अशा अनेक दुष्काळ नियोजन व उपाययोजना करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील ज्वंलत प्रश्न जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन व प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अन्यथा जननायक संघटना या प्रश्नी आवाज उठविणार असा इशारा देऊन विविध मागण्यांचे निवेदन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेत निवासी उपजिल्हाधाधिकारी अनंतराव गव्हाने यांना दिले.
यावेळी बाबासाहेब कोरे, सुर्यकांतराव शेळके, माधवराव गायकवाड, राजाभाऊ मुळे, प्रतापराव शिंदे, सुरेखा मुळे, सुभाषअप्पा सुलगुडले, केशरबाई महापूरे, किशोर घार, नेताजी मस्के आदी उपस्थित होते. सदरील निवेदनात लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये व फळ बागेला १ लक्ष रुपये क्षेत्रफळाप्रमाणे अनुदान द्यावे, सर्व प्रकारचे पीक कर्ज संपुर्ण माफ करावे, पुढील हंगामासाठी तातडीने शेतीला पीक कर्ज द्यावे, कर्ज माफी योजनेत कसलीही अट न टाकता सर्वांचे कर्ज माफ करावे, येणाऱ्या पेरणीसाठी शेतकऱ्याच्या अनुदानावर बियाणे खते जमीन क्षेत्रफळाप्रमाणे द्यावे, विज पंपाचे मागील सर्व बील माफ करावे, लातूर जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरूवात झाली नाही त्या प्रत्येक तालुक्यात किमान ५ अशा ५० छावण्या चालू कराव्या, पिक विमा नुकसानीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ४२ हजार रुपयाप्रमाणे द्यावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.


























































