
पाकिस्तानात सध्या बऱ्याच राजकीय घडमोडी घडत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा झटका दिला. त्यांच्याविरोधातील अविश्वास ठराव रद्द करण्याचा निर्णय ‘असंवैधानिक’ असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. या निकालावर नाराजी दर्शवत इम्रान खान यांनी हिंदुस्थानसोबतचे चांगले संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे बिघडले, असा दावा केला आहे.
शनिवारी अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याचे आदेश तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या मतदानाच्या एक दिवस आधी खान यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका करत आपली नाराजी प्रकट केली. त्याचसोबत हिंदुस्थानची प्रशंसा करताना खान यांनी हिंदुस्थानचे नागरिक खूपच स्वाभिमानी असून त्यांना आदेश देण्याची हिंमत कोणताही बाहेरचा देश करू शकत नाही, असं म्हटलं आहे.
इम्रान म्हणाले की, हिंदुस्थानचं परराष्ट्र धोरण खूपच स्वतंत्र आहे. हिंदुस्थानचं परराष्ट्र धोरण कसं असावं, याबाबत आदेश देण्याची कुठल्याही राष्ट्राची हिंमत होत नाही. हिंदुस्थान सरकार खूपच स्वाभिमानी आहे. मी देखील पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाला स्वतंत्र करू इच्छितो, जोवर माझं सरकार आहे, तोवर मी हाच प्रयत्न करेन, असं इम्रान म्हणाले.
या संबोधनात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, माझे हिंदुस्थान सरकारसोबतचे संबंध हे फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे बिघडले अन्यथा माझे माझ्या शेजारी राष्ट्राशी खूप चांगले संबंध आहेत, असा दावा खान यांनी केला आहे.





























































