50 मंत्री गायब, इम्रान खान एकाकी; पाकिस्तान सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासदार आपल्या पक्षाच्या विरोधात जाऊन अविश्वास प्रस्तावावर मतदान करू शकतो आणि अशा बंडखोर खासदारांची मते मोजण्यात येतील, असा निर्णय पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तर दुसरीकडे अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर 50 मंत्री अचानक गायब झाल्याने पंतप्रधान इम्रान खान हे एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात शुक्रवारीच अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार होता. मात्र बंडखोर खासदारांनी विरोधी पक्षाला साथ दिली तर त्यांना अपात्र ठरविण्यात येईल अशी भूमिका पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी घटनेचा हवाला देत खासदाराला आपल्या पक्षाच्या विरोधात जाऊन अविश्वास प्रस्तावावर मतदान करता येते असा निर्वाळा दिला. अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या खासदारांना अपात्र ठरविण्याची कोणतीही तरतूद घटनेत नसल्याचेही न्या. बंदियाल यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे इम्रान सरकारविरोधात बंड पुकारणाऱ्या खासदारांना बळ मिळाले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्षातील इतर कोणत्याही नेत्याकडे ही जबाबदारी सोपवावी, असा सल्ला लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी दिला आहे.

अविश्वास ठरावाची जोरदार चर्चा सुरू असतानाच इम्रान सरकारमधील 50 मंत्री अचानक गायब झाल्याने पंतप्रधान इम्रान खान एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यात परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी, माहिती मंत्री फवाद चौधरी, संरक्षणमंत्री परवेज खटक, गृहमंत्री शेख राशीद यांचा समावेश आहे. विरोधी पक्षांनी आणलेल्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी 28 मार्चपर्यंत संसद तहकूब केली आहे.