
सामना प्रतिनिधी । पिंपरी
राज्यातील सर्वच सरकारी खात्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. नागरिकांचे कोणतेही काम लाच घेतल्याशिवाय अधिकारी-कर्मचारी करत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यात लाचखोरीत पुणे विभागाने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर राज्याची उपराजधानी नागपूर द्वितीय क्रमांकावर आहे, तसेच संभाजीनगर भ्रष्टाचारात तिसऱ्या स्थानावर आहे.
राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, नांदेड असे ८ विभाग आहेत. या वर्षात ६ डिसेंबरपर्यंत ‘एसीबी’ने या आठ विभागांत एकूण ८२४ सापळे लावले. त्यामध्ये तब्बल १ हजार ९३ लाचखोर लोकसेवकांना अटक केली. पुणे विभागात ‘एसीबी’ने यावर्षी सर्वाधिक १८० सापळे लावले. त्यापाठोपाठ नागपूर विभागात ११९, तर संभाजीनगर विभागात १०८ सापळे लावले. पुणे विभागात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागात ‘एसीबी’ने ११९ सापळे लावून लाचखोरांना जेरबंद केले.
महसूल विभाग टॉपवर
लाचखोरीमध्ये महसूल विभाग दरवर्षीप्रमाणे यावर्षीही टॉपवर आहे. महसूल विभागातील भ्रष्टाचाराची २०१ प्रकरणे उघडकीस आली असून, २५३ जणांना अटक करण्यात आली आहे. सरकारतर्फे अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, या योजनांचे फायदे सर्वसामान्यांना देण्यासाठी लोकसेवकांकडून लाचखोरीचा मार्ग अवलंबिला जातो. ११९ सापळ्यांमध्ये २३९ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले. तृतीय स्थानावर पंचायत समिती असून, ८७ सापळ्यांमध्ये ११३ लाचखोरांना अटक केली.
जनजागृतीची कमतरता
भ्रष्टाचार मुक्तीसाठी ‘एसीबी’ तसेच सरकारी यंत्रणातर्फे वेगवेगळ्या माध्यमांतून जनजागृती केली जाते. मात्र, ती पुरेशी राहत नाही. अनेकांना ‘एसीबी’चे कार्यालय माहिती नसते, तर काहींना हेल्पलाइन क्रमांक माहीत नसतो. अनेक सरकारी कार्यालयांत पोस्टर किंवा भित्तिपत्रके लावल्यास सरकारी कर्मचारी फाडून टाकतात.
पहिले पाच लाचखोर विभाग
खाते प्रकरण अटक
महसूल २०१ २५३
पोलीस १७८ २३६
पंचायत समिती ८६ ११२
राज्य वीज कंपनी ४६ ६०
महापालिका ४२ ६०
विभागवार कारवाई
विभाग सापळा अपसंपदा भ्रष्टाचार
मुंबई ३९ ५ ०
ठाणे ९६ २ २
पुणे १७९ १ ३
नाशिक १०१ ७ १
नागपूर ११९ २ १३
अमरावती ९६ ० ३
संभाजीनगर १०७ ३ ०
नांदेड ८३ १ १






























































