
स्त्रिया मग त्या शहरातील असोत की ग्रामीण भागातील. त्यांच्या समस्या, अडचणी साधारणपणे सारख्याच असतात, पण या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र वेगळा असतो. ग्रामीण भागातील महिला आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या संकटावर ‘हाय काय.. नाय काय’ म्हणत सहजपणे मात करतात. संकटे लिलया झेलत आपल्या आयुष्याची वाटचाल पुढे सुरू ठेवतात. याच विषयांवर भाष्य करणारे ‘ती’च्या समस्येच्या बैलाला’ हे दीर्घांक नाट्य डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृहात रविवार, 10 एप्रिल रोजी सादर केले जाणार आहे.
प्रारंभ कला अकादमीनिर्मित हा प्रयोग असून खुसखुशीत संवाद आणि अभिनयाचा अनोखा आविष्कार या नाटकाच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता येईल. या नाटकाची संकल्पना व लेखन अशुतोष भालेराव यांचे असून दिग्दर्शन डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले आहे. या नाटकातील काव्य लेखनाची बाजू विजया पंडितराव यांनी सांभाळली आहे. तर कीर्ती केरकर, मनीषा आचार्य, सागरिका महाडिक, विजया पंडितराव, मनीषा शितुत, अनघा बापट यांनी भूमिका केली आहे.
‘ती’च्या समस्येच्या बैलाला’ या नाटकाला नितीन पवार यांचे संगीत असून दीपक लाडेवार यांनी रंगभूषा केली आहे. तर रंगमंच सजावट नितीन गवळी यांची आहे. 10 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृहात होणाऱ्या या प्रयोगाला नाट्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले आहे.

























































