सासू-सासऱयांनी केले सुनेचे कन्यादान, बुलढाण्यातील आदर्श लग्नाची होतेय चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एका अनोख्या विवाहाची सध्या चर्चा सुरू आहे. या विवाहादरम्यान सासू-सासऱ्यांनी आपल्या सुनेचे कन्यादान करत नवा आदर्श निर्माण केला.

सुनगाव येथील संतोष वानखेडे या तरुणाचा धामणगाव तालुका संग्रामपूर येथील राधा उमाळे हिच्यासोबत 16 मार्च 2020 रोजी विवाह झाला होता. मात्र दुर्दैवाने 31 ऑगस्ट 2020 रोजी संतोषचा विहिरीत पडून मृत्यू झाला. नवऱयाच्या मृत्यूनंतर राधा सासरी राहत होती. तिचे सासरे शालिग्राम वानखेडे आणि सासू वत्सलाबाई यांनी राधाचा मुलीप्रमाणे सांभाळ केला. त्यानंतर 6 मार्च रोजी राधा हिचा विवाह खेरडा येथील प्रशांत शत्रुघ्न राजनकार यांच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह झाला.

विवाहदरम्यान तिच्या सासू-सासऱयांनी सुनेचे कन्यादान करून साऱयांनाच चकित केले. विशेष म्हणजे लेकाच्या मृत्यूनंतर सात ते आठ महिन्यांतच सासऱयांनी सुनेच्या दुसऱया विवाहासाठी प्रयत्न केला. या विवाहात कोरोनाचे सर्व नियम पाळले गेले. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत छोटेखानी नोंदणी पद्धतीचा विवाह पार पडला.

वानखेडे दांपत्याने विधवा सुनेचा मुलीप्रमाणे सांभाळ केला. त्यामुळेच त्यांनी तिचे कन्यादान करायचे ठरवले. सुनेच्या विवाहासाठी ते काही महिन्यांपासून प्रयत्न करत होते. अखेर त्यांनी सुनेसाठी चांगला वर शोधून तिचे लग्न लावून दिले. यामुळे वानखेडे दांपत्याचे गावागावात कौतुक होत आहे.