
विविध मागण्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर सुरू असलेले कृषी अभियंत्यांचे आंदोलन सोमवारी सहाव्या दिवशीही सुरूच होते. राज्य लोकसेवा आयोगाच्या खेळामुळे आंदोलक कृषी अभियंत्यांवर उपअभियंता होण्याआधी स्वयंपाकी बनण्याची वेळ आली आहे. रविवारी पाचव्या दिवशी 70 जणांची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आंदोलकांची संख्या 70वर पोहोचली आहे.
विविध मागण्यांसाठी राज्यातील 11 जिह्यांतील कृषी अभियंत्यांनी त्या-त्या विद्यापीठात सहा दिवसांपूर्वी आंदोलन सुरू केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर नगर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा व जळगाव येथील महाविद्यालयांतील सुमारे 500 कृषी अभियंत्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलकांना दोन वेळचे जेवण मिळविण्यासाठी आंदोलक विद्यार्थीच स्वयंपाकी बनले आहेत. प्रशासनातील निगरगट्ट अधिकाऱयांमुळे आमच्या शिक्षणाचे साहित्य मिळण्याऐवजी स्वयंपाकाचे साहित्य आमच्या हातात आल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे. आंदोलनाला अनेकांनी भेटी दिल्या. आंदोलनाच्या खर्चास हातभार लावण्याची तयारी दाखवली; परंतु आंदोलकांनी त्याला नकार दिला आहे. आंदोलनाचा सोमवारचा सहावा दिवस सुरू असून, राज्यस्तरावर आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. दिवसागणिक प्रकृती खालावलेल्या आंदोलकांचा आकडा वाढत आहे.
आमच्या मरणानंतर दखल घेणार का?
आंदोलन सुरू असताना एका आंदोलक विद्यार्थिनीची आज तब्येत अचानक बिघडली. तिला तातडीने उपचारार्थ हलविले. आंदोलनात विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या आहेत. 700 आंदोलकांपैकी आतापर्यंत तब्बल 70 जणांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. थंडी, वाऱयाची पर्वा न करता आंदोलनस्थळीच सर्वजण झोपतात. रात्रीच्या वेळी मुलींनी वसतिगृहात झोपण्यासाठी पाठवले जाते. मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. आमच्या मरणानंतर आंदोलनाची दखल घेणार का? असा सवाल शुभम जगदाळे या आंदोलकाने केला आहे.
या आहेत मुख्य मागण्या
कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 व 22 तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावा. स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे. मृदा व जलसंधारण विभागामध्ये कृषी उमेदवारांची अभियांत्रिकी शाखेत भरती करावी. महाराष्ट्र राज्य सेवा 2023 मुख्य परीक्षेत कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी वैकल्पिक विषयाचा समावेश करावा,
या आंदोलकांच्या मुख्य मागण्या आहेत.
विद्यार्थिनींना अश्रू अनावर
विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर रस्त्यावर हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनात विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आंदोलकांनी विद्यापीठाच्या सुरक्षा यंत्रणेच्या कामकाजावर त्यांनी समाधान व्यक्त केले, पण हे असे किती दिवस चालणार? मुलींचे प्रश्न वेगळे आहेत, याची दखल कोण घेणार? आंदोलनादरम्यान विद्यार्थिनींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आमचे प्रश्न तरी समजून घेतले पाहिजे होते, असे म्हणत आंदोलक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले.


























































