
सामना ऑनलाईन, कानपूर
पासपोर्ट हवा असेल तर धर्म बदला अशी अरेरावी करीत पासपोर्ट नाकारल्याचा कांगावा करणाऱ्या तन्वी सेठ आणि अनस सिद्दीकी यांचं पितळ एका प्रत्यक्षदर्शीने उघड पाडलं होतं. विकास मिश्रा या पासपोर्ट अधिकाऱ्याने कोणतीही चूक केली नव्हती, त्यांनी या जोडप्याला कोणताही त्रास दिला नव्हता असं कुलदीप सिंह नावाच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं होतं. सिंह यांनी शनिवारी त्यांचं अपहरण झाल्याची तक्रार केली आहे. पासपोर्ट कार्यालयात घडलेल्या घटनेमुळेच सिंह यांचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी आपल्याला पकडले आणि एका गाडीमध्ये कोंबले असं सिंह यांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अपहरणकर्त्यांनी आपल्याला बेशुद्ध केले आणि हिंदुस्थान-नेपाळ सीमेवर असलेल्या लखीमपूर खिरी भागात अज्ञात स्थळी नेले. शुद्धीवर आल्यानंतर आपण कसाबसा पळ काढला असं कुलदीप सिंह यांनी तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे. माझं कोणाशीही वैर नाहीये असं असताना माझं अपहरण का झालं हे मलाच कळालेलं नाही असं सिंह याचं म्हणणं आहे. हे अपहरण पासपोर्ट अधिकाऱ्याचं समर्थन केल्यामुळे झालं असावं असा संशय सिंह याने वर्तवला आहे.
























































