रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ येतात.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत पाचही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने मताधिक्य घेतले असल्याने महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. रत्नागिरी जिल्हा हा दोन लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. दापोली आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात येतात. तर चिपळूण,रत्नागिरी आणि राजापूर हे दोन मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येतात.
रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अनंत गीते तर महायुतीकडून सुनील तटकरे रिंगणात होते.निवडणूकीत सुनील तटकरे यांचा विजय झाला असला तरी दापोली आणि गुहागर मतदारसंघात अनंत गीते यांनी मताधिक्य घेतले आहे. दापोली मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अनंत गीते यांना 74 हजार 626 मते मिळाली. तर महायुतीच्या सुनील तटकरे यांना 47 हजार 030 मते मिळाली. दापोली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला 8 हजार 432 चे मताधिक्य मिळाले. गुहागर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अनंत गीते यांना 77 हजार 503 मते मिळाली. तर महायुतीच्या सुनील तटकरे यांना 69 हजार 071 मते मिळाली. गुहागर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला 27 हजार 596 चे मताधिक्य मिळाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे विनायक राऊत आणि महायुतीचे नारायण राणे यांच्यात लढत झाली. या लढतीत नारायण राणे जिंकले असले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात त्यांना मताधिक्य मिळवता आलेले नाही. चिपळूण मतदारसंघात महाविकास आघाडीच्या विनायक राऊत यांना 79 हजार 619 मते मिळाली तर महायुतीच्या नारायण राणे यांना 59 हजार 992 मते मिळाली. चिपळूण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला 19 हजार 627 चे मताधिक्य मिळाले. रत्नागिरी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या विनायक राऊत यांना 84 हजार 755 मते मिळाली. तर महायुतीच्या नारायण राणे यांना 74 हजार 718 मते मिळाली. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला 10 हजार 037 चे मताधिक्य मिळाले. राजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या विनायक राऊत यांना 74 हजार 856 मते मिळाली. तर महायुतीच्या नारायण राणे यांना 53 हजार 385 मते मिळाली. राजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला 21 हजार 471 चे मताधिक्य मिळाले.