
तुरुंगातील जेवण असे म्हणताच अंगावर काटा येतो. अत्यंत निकृष्ट आणि चव नसलेले जेवण असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, फारुखाबादमधील एका तुरुंगातील जेवणाला चक्क 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे तुरुंगातील जेवणाबाबतचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे.
अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाने (FSSAI) फारुखाबादमधील फतेहगढ मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना दिल्या जाणार्या अन्नाच्या दर्जाला पंचतारांकित रेटिंग दिले आहे. एफएसएसएआय पथकाच्या ऑडिटने कारागृहातील जेवणाला पंचतारांकित इट राइट सर्टिफिकेट दिले आहे. हे अन्न गुणवत्ता आणि स्वच्छतेत अव्वल आहे. कैद्यांना तुरुंगात दर्जेदार अन्नपदार्थ दिले जात असल्याचे एफएसएसएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा दंडाधिकारी संजय कुमार सिंह यांनी सांगितले की, एफएसएसएआयच्या या रेटिंगनुसार तुरुंगातील 1,100 कैद्यांना स्वच्छ आणि पौष्टिक जेवण दिले जाते. आम्हाला मार्च 2022 मध्ये एफएसएसएआयकडून परवाना मिळाला. त्यानुसार अन्न, दर्जा आणि स्वच्छतेचे नियम पाळत कैद्यांसाठी जेवण बनवण्यात येते. एफएसएसएआयकडून असे रटिंग मिळवणारे हे राज्यातील पहिले कारागृह आहे.
तुरुंग अधीक्षक भीम सेन मुकुंद म्हणाले, आम्ही एफएसएसएआय मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य प्रकारे पालन केले आहे. स्वच्छता,दर्जा आणि अन्न सुरक्षा प्रक्रिया अधिक चांगली करण्यासाठी शिफारसी आणि निरीक्षणानंतर योग्य त्या सुधारणा करत प्री-ऑडिट अहवाल तयार करण्यात आला. इतकेच नाही, तर तुरुंगातील कर्मचार्यांव्यतिरिक्त 1,100 कैद्यांना स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे प्रशिक्षण दिले गेले आहे.
मुकुंद म्हणाले, अन्न बनवण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात स्वयंचलित करण्यात आली आहे. आधी रोट्या बनवणे, भाजीपाला चिरणे आणि कडधान्ये निवडणे, शिजवणे यासाठी कैद्यांची मदत घेण्यात येत होती. ही प्रक्रिया माणासंकडून होत असल्याने त्यात बराच वेळ जायचा. प्रत्येक शिफ्टसाठी सुमारे 50 कैद्यांना जेवण तयार करण्यासाठी एकत्र केले जात होते. आता कारागृह प्रशासनाने त्याचे आधुनिकीकरण केले आहे. रोटी बनवणारी मोठी मशिन, कणिक मळण्याचे यंत्र आणि भाजीसाठी मशीन कटर बसवून घेतले आहे. त्यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
























































