रघु राय यांच्या हस्ते फोटो पत्रकारांच्या वेबसाईटचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बातमी, इतिहास पुन्हा लिहिला जाऊ शकतो, मात्र फोटो हे कायम त्या काळाचे साक्षीदार राहतात. त्यामुळे महत्त्वाच्या घटनेचे फोटो टिपणं ही फोटोग्राफरची जबाबदारी आहे, असं सांगत ज्येष्ठ छायाचित्रकार रघु राय यांनी आज मुंबई प्रेस क्लबच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या picwire.com या वेबसाइटचे उद्घाटन केले. मुंबई आणि महाराष्ट्रातील 80 हून अधिक फोटोपत्रकारांनी आपले काम लोकांपर्यंत पोहचून त्यातून उत्पन्नाचे साधन मिळावे म्हणून ही वेबसाइट सुरू केली आहे.

फोटोपत्रकारांनी सहकारी तत्त्वावर सुरू केलेल्या या वेबसाइटचे राय यांनी कौतुक केले व सहकार्य म्हणून आपलेही फोटो या वेबसाइटवर देण्याचे त्यांनी कबूल केले. कोरोनामुळे फोटोसंबंधित कामं कमी झाल्याचे मान्य करून राय यांनी फोटोपत्रकारांना त्या क्षेत्रामध्ये अर्थाजर्नाचे आणखी काय मार्घ असू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले. क्लबचे अध्यक्ष आणि द वायर या वेबसाइटचे संपादक सिद्धार्थ भाटिया यांनी या वेबसाइटकडून बऱ्याच अपेक्षा असून फोटो पत्रकारांसाठी ते एक व्यासपीठ असल्याचं सांगितलं. क्लबचे सचिव राजेश मॅस्केलनस यांनी ही वेबसाइट केवळ सुरुवात असून अजून त्यात वैविध्य आणणार असल्याचे सांगितले.

आजपासून कार्यान्वयित झालेल्या या वेबसाइटच्या माध्यमातून मुंबई, खेळ, कोविड, राजकारण, बॉलिवूड या क्षेत्रातील अनेक फोटो रोज उपलब्ध होणार आहेत. तसेच विशेष फोटो, जुन्या फोटोंचे संग्रहही इथे बघायला मिळतील. माध्यम समूह, वर्तमानपत्रं, बातम्यांशी संबंधित वेबसाइट, खाजगी संस्था आणि एखादी व्यक्ती हे फोटो वरील वेबसाइटवरून पैसे देऊन डाऊनलोड करू शकतात.