हाफकिनमध्ये कोरोना लसीवर संशोधन आवश्यक, तीन आठवड्यात आराखडा सादर करा

देशातील पहिली जीवशास्त्रीय संशोधन संस्था म्हणून हाफकिन संस्थेचा नावलौकिक आहे. हाफकिनने कॉलरा, रेबीज, सर्पदंश, विंचूदंश अशा अनेक लसी शोधून काढल्या आहेत. त्यामुळे कोरोनाची लस शोधून काढण्यासाठी हाफकीनमध्ये संशोधन होणे आवश्यक आहे असे मत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज व्यक्त केले

हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेची आढावा बैठक अमित देशमुख यांनी आयोजित केली होती. हाफकिन संस्थेने सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण यावर अधिकाधिक भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोरोना बाबतची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता संस्थेचा तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण याबाबतचा आराखडा येत्या तीन आठवड्यात सादर करावा, असे आदेश अमित देशमुख यांनी यांनी यावेळी दिले.

रोडमॅप सादर करा

हाफकिन संस्थेने आतापर्यंत केलेले संशोधन पाहता येणाऱ्य़ा काळात संशोधनाची प्रक्रिया कशी असेल, संशोधन पध्दतीचा रोडमॅप कसा असेल याबाबतही आराखडा सादर करावा. तसेच हाफकिन संस्थेत कंत्राटी पध्दतीने संचालकपदाची भरती किंवा अ‍ॅड ऑन पध्दतीने पदभरती करताना, संचालक किंवा अधिकारी -कर्मचारी यांना नियुक्ती देताना त्यांना देण्यात येणारी वेतनश्रेणी याबाबत सर्व नियम तपासून पहावे असेही ते म्हणाले.

तपासण्या वाढवा

सध्या राज्यभरात कोरोनाच्या तपासण्या सरकारी आणि खासगी प्रयोगशाळेत करण्यात येत आहेत.  हाफकिन संस्था ही तपासणीमध्ये प्रमुख मानली जाण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.आज हाफकिन संस्थेत तपासण्या होत असल्या तरी त्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे, असे अमित देशमुख यांनी सांगितले. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, हाफकिनच्या संचालक शैला ए यांच्यासह हाफकिन संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या