एसटीच्या मालवाहतूक दरात 1 मेपासून वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाने अलीकडेच उत्पन्नवाढीसाठी सुरू केलेल्या मालवाहतूक सेवेच्या दरात वाढत्या इंधन दरामुळे 1 मेपासून वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एकेरी वाहतुकीसाठीचा किमान दर आधी चार हजार रुपये होता. आता नव्याने निर्णयाने किमान दर 4 हजार 500 रुपये इतका वाढविण्यात आला आहे. तर आधी 100 कि.मी.पर्यंतच्या वाहतुकीसाठी 48 रु. प्रति कि.मी. दर होता. तर 101 कि.मी. ते 250 कि.मी.साठी 46 रु. प्रति कि.मी. दर होता तो आता 200 कि.मी.पर्यंत 57 प्रति कि.मी. तर 201 कि.मी.च्या पुढे 55 रु. प्रति कि.मी. अशी दरवाढ करण्यात आली आहे.

महामंडळाच्या वतीने मालवाहतुकीसाठी प्रति दिवस कमीत कमी 4000 रुपये दर ठरविण्यात आला होता; परंतु सदरचा दर जातानाचे आणि येतानाचे कि.मी. ग्राह्य धरून रु. 48 प्रति कि.मी.पेक्षा कमी आकारला जाणार नाही याची दक्षता घेतली जात होती. आता नव्या निणर्याने डिझेलमध्ये भरमसाट वाढ झाल्याने मालवाहतुकीसाठी किमान दर 4,500 रुपये करण्यात आला आहे.