विद्यापीठांच्या ऑफलाइन परीक्षांसाठी वाढीव वेळ, प्रतितास 15 मिनिटे अधिक देण्याचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मे महिन्यात होणाऱया राज्यातील विविध विद्यापीठांच्या ऑफलाइन परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रतितास 15 मिनिटांचा वाढीव वेळ देण्याचा निर्णय बुधवारी पार पडलेल्या कुलगुरूंच्या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षांसाठी लिखाणाचा सराव नाही. त्यामुळे लेखी परीक्षांसाठी जादा वेळ देण्यात यावा, अशी मागणी युवासेनेच्या वतीने उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली होती.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई, कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी विद्यापीठांच्या ऑफलाइन परीक्षांसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी उदय सामंत यांच्याकडे केली होती. राज्यातील विविध विद्यापीठांतंर्गत व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. आता कोरोनाचा प्रसार कमी असल्याने दोन वर्षांनंतर प्रथमच ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र मागील दोन वर्षांत ऑनलाइन आणि एमसीक्यू पद्धतीने परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव नाही. त्यामुळे दिलेल्या वेळेत पेपर सोडवून होईल का याविषयी अनेक विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी परीक्षेच्या नियोजित वेळेपेक्षा अर्धा ते एक तास वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी प्रतितास 15 मिनिटांचा वाढीव वेळ देण्याच्या सूचना कुलगुरूंना दिल्या आहेत.