क्रिकेटसाठी ‘गुलाबी’ झालंय कोलकाता शहर, दिवस-रात्र कसोटीची तयारी अंतिम टप्प्यात

473

हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच दिवसरात्र कसोटी सामना होणार आहे. त्यामुळे कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडियमवर या सामन्याची जय्यत तयारी सुरू आहे. हिंदुस्थान-बांगलादेश संघांमध्ये 22 ते 26 नोव्हेंबरदरम्यान होणारी ही ऐतिहासिक कसोटी गुलाबी चेंडूवर खेळवली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अवघे कोलकाता शहर गुलाबी बनविण्यात आले आहे.

मंदिरे, इमारती, बागाही झाल्या गुलाबी

कोलकाता शहरात सध्या गुलाबीमय वातावरण बनलयं. तेथील मंदिरे, उंच इमारती आणि महापालिकेच्या अनेक बागांमध्येही गुलाबी रोशणाई करण्यात आली आहे. हुगळी नदीवर प्रवासी बोटीलाही गुलाबी प्रकाशाने सजविण्यात आले आहे. 22 नोव्हेंबरपर्यंत हावडा ब्रीज ते विद्यासागर सेतूदरम्यान ही प्रवासी बोट फिरणार आहे. टाटा स्टीलच्या इमारतीवर 20 नोव्हेंबरपासून थ्रीडी मॅपिंग लावण्यात येणार आहे. शहरातील इतर अनेक इमारतींनाही गुलाबी रंगरंगोटी करण्यात आली आहे. सोमवारपासून कोलकाता शहरात डझनभर मोठी पोस्टर्स, सहा एलईडी बोर्ड बघायला मिळतील. लोकांमध्ये या दिवसरात्र कसोटीबद्दल जागृती करण्यात येणार आहे.

शुभंकर पिंकूटिंकूचे अनावरण

‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या हस्ते रविवारी रात्री शुभंकर ‘पिंकू-टिंकू’चे अनावरण करण्यात आले. स्वतः गांगुलीने पिंकू-टिंकू व सामन्याच्या तिकिटासह फोटो काढून घेतला. याचबरोबर एका महाकाय गुलाबी बलूनचेही यावेळी अनावरण करण्यात आले. या दिवसरात्र कसोटी सामन्यादरम्यान हा बलून आकाशात डोलताना दिसणार आहे.

#INDvBAN ऐतिहासिक ‘गुलाबी’ कसोटीपूर्वी रवी शास्त्रींचे होमहवन

ममता बॅनर्जी व शेख हसीना यांची उपस्थिती

या दिवसरात्र कसोटीच्या सुरुवातीला लष्कराचे पॅराट्रूपर्स ईडन गार्डनवर आकाशात भरारी घेतील व नाणेफेकीपूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांकडे गुलाबी चेंडू सोपवतील. त्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते पारंपरिक ईडन बेल वाजवून या ऐतिहासिक कसोटी सामन्याला प्रारंभ होईल. सध्या ईडन गार्डन स्टेडियमकडे जाणाऱ्या सर्वच मार्गांवर रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

माजी खेळाडू मैदानावर फिरणार

कसोटी सामन्यादरम्यानच्या चहापानचा ब्रेक होईल तेव्हा क्रिकेटसह इतर खेळांतीलही अनेक माजी कर्णधार उघडय़ा गाडय़ांमध्ये बसून मैदानावर चक्कर मारणार आहेत. याचबरोबर 40 मिनिटांच्या उपहारावेळी ‘फेबुलस फाईव्ह’ नावाचा टॉक शो होईल. यात ‘टीम इंडिया’चे सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे व व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे पाच माजी क्रिकेटपटू 2001 मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळविलेल्या ऐतिहासिक कसोटी विजयाच्या आठवणी जागवतील.

खेळाडूंचाही होणार सन्मान

‘क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी) कोलकात्याच्या ईडन गार्डनवर आम्ही विविध स्टार खेळाडूंचा सन्मान करणार आहोत. भारतरत्न सचिन तेंडुलकरसह ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा, टेनिस स्टार सानिया मिर्झा, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन पी.व्ही. सिंधू व सहा वेळची जगज्जेती बॉक्सर एमसी  मेरीकोम या खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे. मान्यवर पाहुण्यांसाठी खास स्मृतिचिन्ह बनविण्यात आले आहे. यावेळी हिंदुस्थान व बांगलादेशमध्ये 2000 साली झालेल्या कसोटी सामन्यातील खेळाडूंचाही गौरव करण्यात येणार आहे. सौरव गांगुलीचा कर्णधार या नात्याने तो पहिला कसोटी सामना होता.’

अभिषेक दालमिया, अध्यक्ष, सीएबी

आपली प्रतिक्रिया द्या