
हिंदुस्थानने पहिल्या डावात 131 धावांची घेतलेली आघाडी.. त्यानंतर गोलंदाजांनी दुसऱया डावातही कांगारूंची उडवलेली दाणादाण.. तळाच्या फलंदाजांनी केलेल्या प्रतिकारामुळे यजमानांनी डावाने पराभवाची टाळलेली नामुष्की… तिसऱया दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची उर्वरित 66 षटकांच्या खेळात झालेली 6 बाद 133 अशी दुर्दशा… टीम इंडियाने मेलबर्न कसोटीवर मिळविलेली मजबूत पकड असे दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यातील तीन दिवसांचे वर्णन होय.
ऑस्ट्रेलियाला 195 धावांवर रोखल्यानंतर हिंदुस्थानने 115.1 षटकांत 326 धावसंख्येपर्यंत मजल मारून पहिल्या डावात 131 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाची दुसऱया डावातही 66 षटकांत 6 बाद 133 अशी दुर्दशा झाली. आघाडीची फळी कोसळल्यानंतर तळाच्या फलंदाजांनी अखेरच्या सत्रात प्रतिकार केला म्हणून ऑस्ट्रेलियाला 2 धावांची अल्पशी आघाडी मिळविण्यात यश आले. तिसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा पॅमरून ग्रीन 17, तर पॅट कमिन्स 15 धावांवर खेळत होते.
11 फलंदाजांनी केल्या 182 धावा
तिसऱया दिवशी सकाळी हिंदुस्थानने रविवारच्या 5 बाद 277 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरूवात केली. मात्र, त्यांचे अखेरचे 5 फलंदाज केवळ 49 धावांची भर घालून माघारी परतल्याने हिंदुस्थानला 131 धावांच्या आघाडीवरच समाधान मानावे लागले. अजिंक्य रहाणे 112 धावांवर धावबाद झाल्यानंतर रवींद्र जाडेजाही 57 धावांवर बाद झाला. रविचंद्रन अश्विनने 14 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर नॅथन लायनने शेपूट गुंडाळून हिंदुस्थानचा डाव जास्त लांबू दिला नाही. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचीही दुसऱया डावात 6 बाद 133 अशी वाताहत झाली. त्यामुळे तिसऱया दिवशी उभय संघांचे 11 फलंदाज बाद झाले अन् त्यांना दिवसभरात केवळ 182 धावांच करता आल्या.
ग्रीन-कमिन्सचा प्रतिकार
ऑस्ट्रेलियाचा डाव संकटात असताना पॅमरून ग्रीन आणि पॅट कमिन्स या जोडीने सातव्या विकेटसाठी 34 धावांची अभेद्य भागीदारी करून डावाने पराभवाची नामुष्की टाळण्यात यश मिळविले. या जोडीने तब्बल 18 षटके खेळून काढत आपल्या संघाचा आजचा पराभव किमान मंगळवारपर्यंत तरी लांबविला.
टीम इंडियाचे गोलंदाज ठरले सरस
पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावाची सुरुवातही खराब झाली. उमेश यादवने चौथ्याच षटकात जो बर्न्सला (4) यष्टीमागे पंतकरवी बाद करून हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्यानंतर मॅथ्यू वेड (40) व आलेला मार्नस लाबुशेन (28) यांनी 38 धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रविचंद्रन अश्विनने लाबुशेनला रहाणेकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर ठरावीक अंतराने ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद होत गेले. जसप्रीत बुमराहने एका अप्रतिम चेंडूवर लेग स्टम्पवरील गिल्ली उडवून स्टीव्हन स्मिथचा (8) बहुमोल बळी मिळविला. रवींद्र जाडेजाने मॅथ्यू वेडला पायचीत करून हिंदुस्थानच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. त्यानंतर ट्रेव्हीस हेड (17) व कर्णधार टीम पेन (1) लवकर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव 6 बाद 99 असा संकटात सापडला.




























































