
हिंदुस्थानी क्रिकेट संघाने ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवण्याची संधी गमावली. डेव्हिड वॉर्नर-मार्क्स हॅरीस या सलामीवीरांना अवघ्या 17 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव झटपट गुंडाळण्यात हिंदुस्थानला अपयश आले. मार्नस लाबुशेनच्या पाचव्या कसोटी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेरीस 5 बाद 274 धावा उभारल्या.
हिंदुस्थानच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात अक्षम्य चुका केल्या. तीन महत्त्वपूर्ण झेल सोडल्यामुळे पहिल्याच दिवशी टीम इंडियाचा संघ बॅकफूटवर फेकला गेला आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला पहिल्याच दिवशी दुखापत झाली. 7.5 षटके गोलंदाजी टाकल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. जायबंदी खेळाडूंच्या यादीत आता त्याचीही भर पडलीय. हिंदुस्थानसाठी ही चिंतेची बाब ठरलीय.
70 धावांची भागी अन् स्मिथ पुन्हा ऑफस्पिनला बाद
मार्नस लाबुशेन व स्टीवन स्मिथ या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी यादरम्यान हिंदुस्थानी गोलंदाजांचे आव्हान परतवून लावले. सिडनी कसोटीनंतर याही कसोटीत धावांचा पाऊस पाडणार असे वाटत असतानाच स्टीवन स्मिथ पुन्हा ऑफस्पिनरच्या जाळ्यात अडकला. रवी अश्विनऐवजी संघामध्ये स्थान मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदरने स्टीवन स्मिथला शॉट मिडविकेटवर उभ्या रोहित शर्माकरवी झेलबाद केले. त्याने पाच चौकारांसह 36 धावा केल्या.
113 धावांची भागी अन् नटराजनचा शो
मार्नस लाबुशेन व मॅथ्यू वेड या जोडीने 113 धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न केला. पण टी. नटराजन याने सुरुवातीला मॅथ्यू वेडला 45 धावांवर शार्दुल ठापूरकरवी आणि त्यानंतर मार्नस लाबुशेनला 108 धावांवर रिषभ पंतकरवी झेलबाद करून यजमानांना मोठे धक्के दिले. मार्नस लाबुशेनने 204 चेंडूंत 9 चौकारांसह 108 धावांची खेळी साकारली. हे त्याचे पाचवे कसोटी शतक ठरले.
झेल सुटले
हिंदुस्थानी खेळाडूंनी पहिल्या दिवशी तीन झेल सोडले. नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर मार्नस लाबुशेनचा झेल अजिंक्य रहाणेने गलीमध्ये सोडला. यावेळी तो 37 धावांवर खेळत होता. त्यानंतर टी. नटराजनच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा मार्नस लाबुशेनचा झेल सुटला. यावेळी चेतेश्वर पुजाराने स्लिपमध्ये हा झेल सोडला. मार्नस लाबुशेन त्यावेळी 48 धावांवर खेळत होता. अखेर शार्दुल ठापूरने स्वतःच्या गोलंदाजीवर पॅमरून ग्रीनचा 19 धावांवर झेल सोडला. या तीन सुटलेल्या तीन झेलचा टीम इंडियाला फटका बसला आहे. आता पॅमरून ग्रीन 28 धावांवर तर टीम पेन 38 धावांवर खेळत आहेत.
मालिकेत तिन्ही प्रकारांत पदार्पण करणारा पहिलाच
डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याने ब्रिस्बेनमध्ये कसोटी पदार्पण केले. याच दौऱ्यात त्याने टी-20 व वन डे या क्रिकेटच्या दोन्ही प्रकारांत हिंदुस्थानसाठी श्रीगणेशा केला होता. एकाच मालिकेत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत देशासाठी पहिला सामना खेळणारा टी. नटराजन हा हिंदुस्थानचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.



























































