IND vs AUS 3rd T20 – इशानची ‘ती’ चूक भोवली

ऋतुराज गायकवाडच्या शतकी धमाक्याच्या जोरावर टीम इंडियाने 222 धावांचा डोंगर उभारला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने बाजी मारत हिंदुस्थानच्या तोंडातील विजयाचा घास हिरावून घेतला. मात्र मोक्याच्या वेळी इशान किशनने यष्टीमागे केलेल्या दोन चुका संघाला भोवल्या अन् हिंदुस्थानला पराभव पत्करावा लागला.

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना गुवाहाटीत भरपूर दव पडले असल्यामुळे गोलंदाजांच्या हातातून चेंडू निसटत होता. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 12 चेंडूंत 43 धावांची गरज होती. 19 वे षटक टाकायला आलेल्या अक्षर पटेलने 3 चेंडूंत 10 धावा दिल्या होत्या. त्याने चौथा चेंडू निर्धाव टाकला. सामना टीम इंडियाच्या हातात आलेला असताना अचानक इशान किशनने यष्टिचीतसाठी अपील केले.

पंचांनी इशानच्या यष्टिचीतचा रिव्ह्यू पाहिला अन् तो चेंडू नो बॉल दिला. कारण किशनने यष्टीच्या पुढे चेंडू पकडला होता. मग पुढचा चेंडू फ्री हिट देण्यात आला. मॅथ्यू वेडने नो बॉलचा पुरेपूर फायदा घेत षटकार ठोकला. इशानच्या एका चुकीमुळे ऑस्ट्रेलियाला 7 धावा मिळाल्या.

धोनी आणखी तीन वर्षे खेळणार

2023 चे आयपीएल महेंद्रसिंग धोनीचे शेवटचे आयपीएल मानले जात होते, पण कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत त्याला पाहून बरे वाटले. चेन्नईचा संघ कागदावर फार आकर्षक वाटत नाही, पण तो आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये नेहमीच असतो. तसेच धोनीसुद्धा पुढील तीन आयपीएल हमखास खेळेल, असा विश्वासही दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने व्यक्त केला.

दिग्गज कर्णधारांसह खेळता येणार 

हिंदुस्थानच्या दिग्गज कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा आयपीएलमध्ये चांगलाच फायदा मिळेल, असा विश्वास हिंदुस्थानचा आक्रमक सलामीवीर आणि गुजरात टायटन्सचा नवकर्णधार शुबमन गिलने बोलून दाखवला. हार्दिक पंडय़ा मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर गुजरात टायटन्सचे नेतृत्व गिलकडे सोपविण्यात आले आहे. कर्णधार हा नेहमीच महत्त्वाचा धागा असतो. त्याच्यामुळे शिस्त येते. त्याच्यामुळेच प्रामाणिकपणा येतो. त्यांच्यामुळेच कठोर मेहनत करता येते. मी दिग्गज खेळाडूंच्या नेतृत्वात खेळतोय. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालेय. त्याचा फायदा मला आयपीएलमध्ये नक्कीच होईल.