आता विलगीकरण नको! बीसीसीआयचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेटपटू आयपीएलपासूनच ‘बायोबबल’मध्ये राहत आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन दौऱ्याची सुरुवात 14 दिवसांच्या विलगीकरणापासून केलीय. अॅडलेड, मेलबर्न येथील पहिल्या दोन कसोटींनंतर आता 7 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीदरम्यानही हिंदुस्थानी खेळाडू कोरोना संबंधितचे नियम पाळत आहे. मात्र तरीही ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी हिंदुस्थानी खेळाडूंवर कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. या मुद्दय़ावर बीसीसीआय संतापले आहे.

हिंदुस्थानी खेळाडूंना कडक निर्बंध लावू नयेत. विलगीकरणात ठेवू नये, अशी भूमिका घेत बीसीसीआय लवकरच क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा करणार आहे. तसेच कोरोना संबंधितच्या कडक नियमामुळे चौथी कसोटी ब्रिस्बेनऐवजी सिडनीत खेळवण्यात यावी अन्यथा मालिका तीन सामन्यांनंतरच संपवावी, असाही विचार बीसीसीआय करीत आहे.

क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये प्रवेश, स्थानिकांनाही मुभा

सिडनी कसोटीसाठी 25 टक्के क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच सिडनी येथील स्थानिकांनाही पुठेही फिरण्याची मुभा देण्यात आली आहे. याचप्रसंगी टीम इंडियाच्या खेळाडूंना मात्र ‘हॉटेल-स्टेडियम-हॉटेल’पर्यंतच मर्यादित का ठेवण्यात येत आहे, असा सवाल बीसीसीआयकडून या वेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारण्यात आला आहे.

…तरच चौथी कसोटी खेळणार

बीसीसीआय क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे पर्याय ठेवणार आहे. क्विन्सलॅण्ड सरकारकडून हिंदुस्थानी खेळाडूंसाठी चौथ्या कसोटीदरम्यान लावण्यात येणारे निर्बंध हटवावेत अन्यथा दोन देशांमधील चौथी कसोटी ब्रिस्बेनऐवजी सिडनीलाच खेळवण्यात यावी. अन्यथा दोन देशांमधील ही मालिका तीन कसोटींनंतरच संपुष्टात येईल, असा इशाराही बीसीसीआयकडून देण्यात आला आहे.