
कर्णधार शुभमन गिलची बॅट एजबॅस्टन कसोटीमध्ये चांगलीच तळपली आहे. पहिल्या डावात द्विशतक ठोकल्यानंतर आता पुन्हा एकदा त्याने दुसऱ्या डावात शतक ठोकलं आहे. 130 चेंडूंचा सामना करत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने त्याने नाबाद 100* धावा केल्या आहेत. याचसोबत त्याने टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांचा 54 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढला आहे.
शुभमन गिलने पहिल्या डावात संयमी फलंदाजी करत 387 चेंडूंचा सामना केला आणि 269 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाने पहिल्या डावात 587 धावांपर्यंत मजल मारली. आता दुसऱ्या डावातही कर्णधाराने जबाबदारी ओळखत संयमी फलंदाजीचे प्रदर्शन केलं आहे. त्यामुळे टीम इंडियाची आघाडी आता 484 धावांपर्यंत पोहचली आहे. शुभमन गिलच हे शतक विशेष ठरलं आहे. कारण त्याने सुनील गावसकर यांचा विक्रम मोडित काढला आहे. शुभमन गिल एकाच कसोटी सामन्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम सुनील गावसकर यांच्या नावावर होता. त्यांनी 1971 साली वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन कसोटीमध्ये 344 धावा केल्या होत्या. त्यांनी पहिल्या डावात 124 आणि दुसऱ्या डावात 220 धावा केल्या होत्या. तर शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीमध्ये आतापर्यंत 369* धावा केल्या आहेत.



























































