
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने दमदार सुरुवात केली. सलामीला आलेल्या यशस्वी आणि केएल राहुल (46 धावा) या दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. यशस्वीने अर्धशतकीय पारी खेळत इतिहास रचला आहे. यशस्वी जयस्वाल तब्बल 50 वर्षांनी ओल्ड ट्रॅफर्डवर अर्धशतक झळकावणारा पहिला हिंदुस्थानी सलामीवीर ठरला आहे.
यशस्वीने सलामीला येत 107 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकार आणि 1 षटकार मारत 58 धावांची खेळी केली. त्याला लियाम डॉसन याने बाद केले. मात्र त्याची ही अर्धशतकीय खेळी विशेष ठरली आहे. 1974 साली टीम इंडियाचे माजी फलंदाजी सुनील गावसकर यांनी सलामीला येत याच मैदानावर इंग्लंडविरुद्ध 58 धावा केल्या होत्या. मात्र सुनील गावसकर यांच्यानंतर या मैदानावर अर्धशतक ठोकण्यात कोणत्याच हिंदुस्थानी सलामीवीराला यश आले नाही. त्यामुळे एक प्रकारे हा एक विक्रमच त्यांच्या नावावर होता. परंतु त्यांचा हा विक्रम आता तरुण तडफदार यशस्वीने मोडित काढला आहे.