INDvsENG चेन्नई कसोटी रंगतदार स्थितीत, चौथ्या दिवसाखेर टीम इंडियाच्या 1 बाद 39 धावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात सुरू असलेली चेन्नई कसोटी रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. इंग्लंडचा दुसरा डाव टीम इंडियाने 178 धावांमध्ये रोखला असून पाहुण्या संघाने यजमानांपुढे विजयासाठी 420 धावांचे आव्हान ठेवले आहे. चेन्नई कसोटीचा उद्याचा संपूर्ण दिवस बाकी असून आजही काही षटक टीम इंडियाला फलंदाजीसाठी मिळतील. खेळपट्टीचे स्वरुप पाहता या कसोटीचा निकाल लागण्याचीच शक्यता अधिक आहे.

टीम इंडियाचा पहिला डाव 337 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर इंग्लंडला 241 धावांची आघाडी मिळाली. परंतु जो रूटच्या संघाने टीम इंडियाला फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र आर. अश्विनने पहिल्याच चेंडूवर रॉरी बर्न्सचा बळी घेत हा निर्णय चुकल्याचे सिद्ध केले. यानंतर रुट (40) वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज 30 चा आकडा गाठू शकला नाही.

वेगाने धावा करण्याच्या नादात इंग्लंडचे फलंदाज अश्विनच्या फिरकीमध्ये अडकत गेले. अश्विनने 17.3 षटकांची गोलंदाजी केली आणि यात 61 धावा देत 6 बळी घेतले. शाहबाज नदीमने 2, तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 बळी घेतला.

चौथ्या दिवसाखेर टीम इंडियाने रोहित शर्माची विकेट गमावून 39 धावा केल्या आहेत. पुजारा 12 आणि गिल 15 धावांवर नाबाद आहेत. कसोटीचा उद्या पाचवा आणि अखेरचा दिवस आहे.

कसोटीचा निकाल लागणार?

दरम्यान, चेन्नईच्या मैदानावर टीम इंडियाने याआधी 2008 ला 387 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यावेळी सचिनने नाबाद शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. चौथ्या दिवशी अखेरच्या एक तासात सेहवागने तुफानी फलंदाजी केल्याने हा विजय मिळवता आला होता. विराट कोहलीच्या संघालाही चेन्नई कसोटी जिंकायची असल्यास सलामीवीर खेळाडूंना तुफानी खेळ करावा लागेल, मात्र खेळपट्टीचा अंदाज पाहता टीम इंडियाचा कल कसोटी अनिर्णित राखण्याकडे असण्याचीच शक्यता जास्त आहे.