जाडेजाच्या संघर्षानंतरही लॉर्ड्स हातून निसटला, थरारक कसोटीत हिंदुस्थानचा 22 धावांनी पराभव; विजयासह यजमान इंग्लंडची मालिकेत आघाडी

सर रवींद्र जाडेजाच्या संयमी, धीरोदात्त अन् झुंजार खेळानंतरही हिंदुस्थान लॉर्ड्सच्या गडावर पोहोचूनही तिरंगा फडकवू शकला नाही. लॉर्ड्सचा गड सर करू शकला नाही. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज या दोन्ही तळाच्या फलंदाजांनी जाडेजाच्या साथीने विजयासाठी इंच इंच भूमी लढवत लॉर्ड्सवर विजयाचे किरण दाखवले. एवढेच नव्हे तर, 35 षटके किल्ला लढवला. अंगावर वेगवान चेंडूंचे वार झेलले, पण विजयापासून 22 धावा दूर असताना विजयाची पोळी हिंदुस्थानच्या हातातून निसटली आणि ती थेट इंग्लंडच्या ताटात जाऊन पडली. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-1 अशा विजयासह जल्लोष साजरा केला आणि हिंदुस्थानने सहज जिंकणारा सामना अवघड करून गमावला.

इंग्लंडचा दुसरा डाव काल 192 धावांवर गुंडाळल्यानंतर हिंदुस्थानला मालिकेत आघाडीची सुवर्णसंधी होती. हिंदुस्थानच्या फलंदाजीची ताकद पाहाता लॉर्ड्सवर आपण जिंकणार हेच साऱयांचे मत होते. पण काल दिवसअखेर हिंदुस्थानच्या झालेल्या पडझडीने सामन्याला कलाटणी दिली. तरीही कसोटीवर आपलेच वर्चस्व होते. पण पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जे नको होते तेच घडले. काल दिवसाच्या शेवटच्या षटकांत नाइट वॉचमन आकाश दीप विझला होता. मात्र आज सकाळी ऋषभ पंतकडून झुंजार खेळीची अपेक्षा होती. त्याच्या बॅटीतून निघालेल्या धावा गडावर सुसाट वेगाने पोहोचवण्यासाठी निर्णायक होत्या, पण त्याने अपेक्षाभंग केला आणि तिथूनच सारा डाव उलटायला सुरुवात झाली. नेहमीच संयमाने खेळणाऱया केएल राहुलची विकेट काढल्यावर बेन स्टोक्ससह इंग्लिश खेळाडूंचा जल्लोष लॉर्ड्स जिंकल्यासारखाच होता. आणि थरारक क्लायमॅक्सनंतर बशीरच्या फिरकीने त्यावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडला विजयाचे क्षण दाखवण्यासाठी 24 षटके गोलंदाजी करत 3 विकेट टिपणारा कर्णधार बेन स्टोक्स लॉर्ड्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने कसोटीत 77 धावांसह 5 विकेटही टिपल्या.

मधल्या फळीने घात केला

हिंदुस्थानी संघासमोर असलेले 193 धावांचे लहानसे आव्हानही डोंगराएवढे वाटले ते मधल्या फळीत ऋषभ पंत (9), वॉशिंग्टन सुंदर (0) आणि नितीश कुमार रेड्डी (13) यांनी घात केल्यामुळे. हिंदुस्थानला सहज साध्य असलेले विजयी लक्ष्य यांनीच अवघड केले. कालच्या 4 बाद 58 वरून हिंदुस्थानसाठी लॉर्ड्सवर विजयासाठी देवाचा धावा करावा लागणार हे दिसले होते. दुसरीकडे इंग्लंडनेही देव पाण्यात ठेवले. आज पहिल्या सत्रात चार रथी-महारथी कोसळल्यामुळे 54 धावांचीच भर पडली. इथेच लॉर्ड्स हिंदुस्थानच्या हातून निसटला होता. पहिल्या सत्रात हिंदुस्थानच्या एका फलंदाजाने जरी संयम दाखवला असता तरी लॉर्ड्सवर हिंदुस्थानला विजयासाठी शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला नसता. लॉर्ड्सवर तिरंगा चहापानाच्या आधीच फडकला असता.

सर जाडेजाला तोड नाही…

मधल्या फळीच्या फलंदाजांनी पहिल्या सत्रात खालेल्या मातीमुळे हिंदुस्थानने सामना इंग्लंडच्या हातात दिला. आपण लॉर्ड्स हरलो नाही, तर तो गमावला. विजयाची किल्ली आपल्या हातात होती. आपण किल्लीच नव्हे, तर रिमोट आणि त्याचा पासवर्ड सगळं काही इंग्लंडच्या हातात दिलं आणि विजयी व्हा म्हणून बळही दिलं. 193 धावांच्या माफक आव्हानाला अवघड करताना 8 बाद 112 अशी भयाण अवस्था झाल्यानंतर साऱयांनीच धीर सोडला होता. अपवाद फक्त जाडेजाचा. त्याने संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर इंग्लंडच्या गोलंदाजांची जी परीक्षा घेतली त्याला तोड नाही. त्याच्या खेळाने इंग्लंडच्या पायाखालची जमीनच सरकवली. त्याचा खेळ पाहून बुमराने केलेला सामनाही कौतुकास्पद होता. त्याचा खेळ पाहून काहीतरी चमत्कार घडेल असं मनी चित्र दिसू लागलं. त्याने चक्क दुसऱ्या सत्राचा पावणे दोन तासांचा खेळ जाडेजासह खेळून काढला. तळाच्या फलंदाजांसह अत्यंत चतुराईने जाडेजाने केलेली लढाई भन्नाट होती. विजयाचे युद्ध आपण जिंकू शकतो, असा विश्वासही त्याने निर्माण केला होता. पण तेव्हाच संयमी बुमराने संतुलन गमावले आणि त्याची विकेट इंग्लंडने मिळवली. त्यावेळी सिराजही बुमराकडून प्रेरणा घेऊन आल्यासारखा धीराने उभा राहिला. त्यानेही इंग्लंडच्या गोलंदाजांना अंगावर घेतले. शेवटी त्याच्याही संघर्षाला मर्यादा आहेत. त्याने बशीरच्या एका चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू मागे गेला आणि स्टम्पवर आदळला. आपण हरलो. सामना हातात असताना तो कसा हरायचा ते मधल्या फळीने पुन्हा दाखवले. सर जाडेजाचा संघर्ष लॉर्ड्सचा किल्ला सर करण्यात अपयशी ठरला. तो लढला, भिडला आणि 61 धावांवर नाबाद राहिला. साडेचार तासांचा संघर्ष एजबॅस्टनच्या इतिहासाची पुनरावृत्ती करू शकला नाही. या पराभवामुळे हिंदुस्थानने मालिकेत आघाडीची संधी गमावली.